सायबर क्राईमचा नवा फंडा सेक्सटॉर्शन

सायबर क्राईमचा नवा फंडा सेक्सटॉर्शन

आता स्मार्ट मोबाईल नवीन राहिलेला नाही, मनोरंजन, कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर वाढतोच आहे.अशा ऑनलाईन तरुणांना लक्ष करण्यासाठी सायबर गुन्हेगार पाळत ठेवतात.ऑनलाईन मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.यातून त्यांची शिकार अलगद त्यांच्या जाळ्यात अडकते. यामुळे आता सोशल मीडियाचा वापर करताना कमालीचे गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे. सोशल मीडियावर ओळख करणे,मैत्रीचे एका भावनिक नात्यात परिवर्तन करणे आणि हळूहळू पैसे उकळणे अशा घटनांना यातूनच खतपाणी मिळू लागले आहे.या साऱ्याच घटना गंभीर आणि समाजमनाच्या स्वास्थ्याला तडा देणाऱ्या निश्चितपणे ठरत आहेत म्हणूनच त्याचे गांभीर्य अधिक होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी तरुणींकडून तरुणांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल आणि बदनाम करण्याचा सेक्स्टॉर्शनचा प्रकार रुजू लागला आहे. या विळख्यात तरुणाई अलगद अडकू लागली आहे.

सेक्स्टॉर्शन म्हणजे नेमके काय ?….

सेक्स्टॉर्शनचे बळी होण्यापासून सावध राहणे आताच्या काळात गरजेचे आहे.सायबर फसवणूक करणारे गुन्हेगार सेक्स्टॉर्शनकडे वळले आहेत.पुरावा उघड करण्याची धमकी देऊन एखाद्याकडून पैसे उकळण्याची किंवा लैंगिक इच्छेची मागणी यात केली जाते. विशेष म्हणजे यात महिला गुन्हेगार कॅमेऱ्याच्या मागे आहेत. सायबर गुन्हेगार हे केवळ पुरुषच आहेत असे नाही तर अनेकवेळा काही महिलाही याचा गैरफायदा घेत आहेत.

सेक्स्टॉर्शन म्हणजे लैंगिक खंडणी होय.हा ब्लॅकमेलचाच प्रकार आहे.गुन्हेगारांकडून या माध्यमातून लैंगिक अनुकूलता,पैसे किंवा इतर स्वरूपाची मागणी केली जाते, यासाठी वेठीस धरले जाते. यात गुन्हेगारांकडे समोरच्याशी काही तडजोड करण्यास भाग पाडू शकतील, अशा आक्षेपार्ह छायाचित्रांचा संच, व्हिडिओ असतात. समोरच्याने जर अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, तर ‘मटेरियल’ ऑनलाईन प्रकाशित करण्याची किंवा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकाऱ्यांसोबत शेअर करण्याची धमकी दिली जाते.

सेक्स्टॉर्शन कसे सुरु होते :

सेक्स्टॉर्शनची सुरुवात साधारणपणे अनोळखी तरुणींकडून सोशल माध्यमात फ्रेंड रिक्वेस्टने होते.नागरी तसेच ग्रामीण भागातदेखील ऑनलाईन असणे हे काही इंटरनेटच्या युगात नवीन राहिलेले नाही. अनेकजण आपला बराचवेळ समाज माध्यमांवर घालवतात.यातूनच कुतूहल आणि उत्सुकतेने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते.त्यानंतर साहजिकच चेंटिंगचा टप्पा सुरू होतो.

सुरुवातीला काही मेसेज आणि नंतर संभाषण अधिक खासगी होत जाते.नंतर तर व्हॉट्स ॲप सुरू होते.यातून नंबर शेअर होतो.कळत नकळत नंतरच्या गोष्टी अतिशय वेगाने घडतात. काही बघायचे आहे का,अशी विचारणा तिकडून होते. बाथरूममध्ये जावा, सूचनांचे पालन करा,असे सांगण्यात येते. काही क्षणातच एक व्हिडीओ कॉल येतो. समोरचा इतका उत्साहित होतो की तो समोर कोण आहे हेदेखील स्पष्टपणे पाहू शकत नसतो मात्र पाहण्याची खूप उत्सुकता असते. यात काहीच क्षण जातात आणि खरा खेळ इथेच सुरू होतो.

थोड्या वेळातच त्या तरुणाचा मोबाईल बाजतो आणि भयानक घटनाक्रम सुरू होतो. नुकत्याच एन्जॉय केलेल्या व्हिडीओ चॅटची रेकॉर्ड केलेली क्लिप कोणीतरी पाठवलेली असते.पैसे द्या अन्यथा क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिलेली असते. मात्र पैसे देऊन देखील अशा सेक्सटॉर्शनचा शेवट होतोच असे नाही यासाठीच आता ऑनलाईन असताना अखंड सावध राहणे गरजेचे आहे.

अशा या सेक्स्टॉर्शनच्या विळख्यात अनेक तरुण अलगद बळी पडू लागले आहेत.अशा अनेक घटना घडत आहेत परंतु एखादीच घटना रेकॉर्डवर येते. अनेक घटना रेकॉर्डवर येत नाहीत त्यामुळे याचे गांभीर्य वाढत राहिले आहे.कोरोना काळापासून तर असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळापासून अनेकजण सतत ऑनलाईन असतात यातूनच सेक्सटॉर्शनच्या अनेक घटना वाढत गेल्या.

यात प्रामुख्याने पैसेवाल्या कुटुंबातील मुले तरुण,चांगले नोकरदार,व्यावसायिक, उद्योजक अशांना यात ओढल्याच्या घटना घडत आहेत.भीती, बदनामी टाळण्यासाठी यातून मागेल तेवढे पैसे दिले जातात.

या साऱ्या प्रकाराची पोलिसांच्या सायबर सेलने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आता प्रबोधनाची देखील गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top