नामदेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरात आगमन

नामदेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरात आगमन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आळंदी येथे कैवल्य साम्राज्य श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करून परतीच्या दिशेने निघालेल्या संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यांचे सोमवारी पंढरपूरात आगमन झाले.

मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी व गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा झाला.या सोहळ्यासाठी संत-महंतांच्या पालख्यांसह लाखो भाविक आळंदीत दाखल झाले होते. अमावस्येपर्यंत पालखी सोहळ्यांचा मुक्काम आळंदी येथील श्री विष्णु मंदिर येथे होता.

रविवार दि.1 डिसेंबर रोजी अमावस्येनिमित्त काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संतांच्या पालखी सोहळ्यांनी परतीच्या दिशेने प्रवास सुरु केला.सोमवार दि.9 डिसेंबर,मार्गशीर्ष शु.9 दिवशी पालखी सोहळ्यांचे दुपारी 5 वाजता इसबावी येथील विसावा मंदिराजवळ आगमन झाले. याठिकाणी महाराज मंडळी, मानकरी व नागरिकांनी दर्शन घेवून पालखी सोहळ्याचे स्वागत करून अभंग व आरती करण्यात आली. पालखी रथ फुलांनी सजविण्यात आला. त्यानंतर शाही लवाजम्यासह सनई-चौघड्याच्या निनादात, हरिनामाचा गजर करत पालखी सोहळा संत नामदेव पायरी येथे आला.यावेळी अभंग, आरती करण्यात आली.त्यानंतर पालखी सोहळा संत नामदेव मंदिरात विसावला. नामदास परिवारातील सुवासिनी महिलांनी पालखीचे औक्षण केले. याठिकाणी श्री केशवराज, संत नामदेव-जनाबाई यांची आरती झाल्यानंतर मानकर्‍यांना श्रीफळ प्रसाद देण्यात आला.

पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्वश्री ह.भ.प.माधव महाराज,मुकुंद महाराज, केशव महाराज,कृष्णदास महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ महाराज, विठ्ठल महाराज,हरि महाराज, निवृत्ती महाराज,मुरारी महाराज, केदार महाराज,भावार्थ महाराज,आदित्य महाराज यांच्यासह नामदास महाराज परिवार व फडकर्‍यांनी परिश्रम घेतले.

वारकर्‍यांना अल्पोपहाराचे वाटप

संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे संत नामदेव शिंपी समाज, युवक संघटनेच्यावतीने चहा, केळी व शाबू खिचडी या अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गणेश उंडाळे,उपाध्यक्ष संजय जवंजाळ,खजिनदार शशिकांत जवंजाळ,विश्‍वस्त राजेश धोकटे,बाबासाहेब म्हैंदरकर,विलास पोरे,सेवक कृष्णा जवंजाळ, जयवंत कांबळे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर भावलेकर गुरुजी, विष्णु पोरे, गोविंद वेल्हाळ, रत्नाकर पिसे, दत्ता चांडोले, शिवकुमार भावलेकर, युवक संघटनेचे अध्यश शैलेश धट,महेश गानमोटे यांच्यासह हजारो वारकरी,समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top