सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- अखिल भारत जयगुरू संप्रदायाचे सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज, कलकत्ता यांनी दि. 07 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची मुर्ती व उपरणे देऊन सन्मान केला.

किंकर विठ्ठल रामानुज महाराज श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत. त्यांना अलौकिक मधुर आवाजाचे वरदान लाभले आहे. महाराजांच्या सत्संगाचा लाभ घेतलेल्या असंख्य साधकांचा हाच अनुभव आहे. त्यांनी आपल्या संगीत प्रविणतेचा उपयोग करून भगवान नाम अनेक रागांमध्ये विणले आहे. अतिशय मधुर स्वरांची हे सृजन म्हणजे अतिशय अद्भुत आणि अमूल्य ठेवा आहे, ज्याचे श्रवण केल्यावर श्रोते भगवान नामाकडे आकर्षित होतात; लोकांना नामाबद्दल आत्मीयता प्राप्त होते, तर अनेक साधकांना ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा…’ ही रचना अनुभवायला मिळते आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती व्यापक आणि गतिमान होते. चित्त का नित्य महोत्सव ग्रंथ व ‘तणावमुक्त व्हा’ या पुस्तकाचे लेखन करून, सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करून वाचकाला अध्यात्म, गुरू आणि देव इत्यादींची ओळख अगदी सोप्या पद्धतीने करून देत आहेत. त्यांनी ‘सहजक्रिया योग’ नावाची अतिशय सोपी पण प्रभावी योग पद्धत विकसित केली असून, या पद्धतीमध्ये प्राणायाम, प्रणाम आणि मंत्रजप यांचा अतिशय प्रभावी मिलाफ आहे. त्यांना अखिल भारत जय गुरु संप्रदायाचे तिसरे ‘सर्वाधिश’ म्हणून नाव देण्यात आले असून, त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली भारतात कार्यरत असलेल्या पंच्याहत्तरहून अधिक धार्मिक केंद्रांमध्ये आश्रमाची काळजी, ‘नाम’ शिकवणे, सनातन धर्माचा प्रचार, भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम मोठ्या प्रेमाने आयोजित केले जातात, असा त्यांचा परिचय आहे.

यावेळी रामानुज महाराज यांनी मंदिर समितीला ५१ हजार रूपये इतकी धनादेश स्वरूपात देणगी दिली आहे. तसेच त्यांनी श्री संत तुकाराम भवन येथे भजन देखील केले असून, त्यांच्यावतीने व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला व सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा देखील सन्मान व्यवस्थापक यांनी स्वीकारला. याशिवाय, ज्ञानेश्वर कुलकर्णी, पांडूरंग बुरांडे, भिमाशंकर सारवाडकर, राजेश पिटले, चंद्रकांत कोळी, प्रसाद दशपुत्रे, राजकुमार कुलकर्णी, सुधाकर घोडके, विशाल देवकुळे, सुशिलकुमार ढेकळे पाटील या कर्मचा-यांचा देखील सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी व रामानुज महाराज यांचे भक्तगण उपस्थित होते,असे मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
