सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२४ – जात,धर्म,प्रांत आणि भाषेपेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत अशी प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी देशात सामाजिक समता आणि आर्थिक समता स्थापन व्हावी असे स्वप्न पाहिले होते.त्यांचे सामाजिक आणि आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा आपण निर्धार करुया हिच खरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दुपारी 3.30 वाजता चैत्यभुमी दादर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.
त्यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ.सिमाताई आणि पुत्र जित उपस्थित होते.रिपाइं चे मुबंई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे,चंद्रशेखर कांबळे, अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, रवि गायकवाड,मयुर बनसोडे खटाव आदि उपस्थित होते.

6 डिसेंबर हा दिन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने दु:खाचा दिवस जरी असला तरी आमच्या प्राणप्रिय मुक्तीदात्याला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञतेने अभिवादन करण्याचा आणि प्रेरणा घेण्याचा दिन आहे असे सांगत ना.रामदास आठवले यांनी सकाळी नवी दिल्लीत संसदेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पाजंली वाहुन अभिवादन केले.त्यानंतर नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन महापरिनिर्वाणदिनी अभिवादन केले.
