पालघरमधील शालेय आहारात सापडल्या अळ्या-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या टीमकडून वस्तूस्थितीचा आढावा
पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३/१२/२४ : पालघर जिल्ह्यात एका शाळेतील पोषण आहारात (मिलेट बार) अळी आणि बुरशी आढळल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.या प्रकरणातील वस्तूस्थितीचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला.त्यांनी सोमवार,दि.२ डिसेंबर 2024 रोजी आपली टीम पालघरमधील जिल्हा परिषद कार्यालयात पाठवून चौकशी सुरू केली.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे आणि शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना हे मिलेटबार देण्यात येतात. रागी, ज्वारी आणि बाजरी या तीन धान्यांपासून हे प्रोटीन बार बनलेले आहेत.

या प्रकरणाचा पंचनामा केलेला आहे, त्याचबरोबर शाळा व्यवस्था समितीशीही याबाबत बोलणं झालेलं आहे असे त्यांनी सांगितले.तर अन्न आणि औषध प्रशासनाने चिंचणी शाळा क्रमांक.३ ला भेट देत प्रोटीन बारचे एकूण सात सॅम्पल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.सात खोक्यामध्ये 1300 मिलेट बार आहेत. यावेळी वाडा तालुक्यातील खानिवली येथील शाळांमध्येही त्यांनी तपासणी केली.
या प्रकरणाबाबत बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी,हा प्रकार महिला आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असल्याचे म्हटले. ग्रामीण क्षेत्रात बहुतेक मुलं या आहाराच्या आधारेच उदरनिर्वाह करीत असतात त्यांना हा आहार पोषणयुक्त मिळावा,असंही त्या यावेळी म्हणाल्या.
अहवालाच्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. त्याआधारे महत्त्वाच्या सूचना संबंधित विभागाचे सचिव (FDA, शालेय,ग्रामविकास) यांना केलेल्या आहेत.
१. प्राथमिक शाळेतील मुलांना न्यूट्रिशन बार , शालेय पोषण आहार पुरवले जातात त्या आहाराचा दर्जा तपासून जिल्हा परिषद स्तरावर सुमार दर्जाचे पुरवठा करण्यात आलेले खाद्य नाकारण्यात यावे.
२. पुरवण्यात येणारे खाद्यपदार्थ योग्य आहे की नाही याची तपासणी करण्याची एसओपी बनवण्यात यावी. सदरचे खाद्य तपासताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे. तसे अधिकार स्थानिक यंत्रणांना देण्यात यावे.
३. पालघर जिल्ह्यातील चिंचणी व खानिवली येथील तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासनाने सॅम्पल घेतले आहेत.त्यांचे अहवाल अप्राप्त आहेत.खराब खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या पुरवठादारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
४. पुरवण्यात येणारे खाद्यपदार्थ यांची साठवणूक व्यवस्था उत्तम असावी याची दक्षता शालेय स्तरावर घेण्यात यावी. याची जबाबदारी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात यावी.
५. पुरवठा दराच्या निविदांमधील अटी शर्तीनुसार दर्जेदार खाद्य साहित्य असेल तरच स्वीकारण्याच्या व प्रत्येक टप्प्यावर गुण नियंत्रण राहील याची दक्षता घ्यावी.
राज्यातील सर्वच ठिकाणी दर्जेदार पोषण आहार खाद्य मिळेल याची दक्षता घ्यावी. यासंदर्भात लवकरच विधान भवनामध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात येईल.