गंधार देशपांडे यांच्या अभिजात शास्त्रीय संगीताची पंढरपूरकर रसिक श्रोत्यांना पडली भुरळ
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर गणेशोत्सव संगीत महोत्सव
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम भवन येथे श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवात चौथे पुष्प महाराष्ट्रातील ख्यातनाम शास्त्रीय गायक गंधार देशपांडे यांनी गुंफले.
सुरुवातीला सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री, गायक गंधार देशपांडे ,स्वप्निल भिसे ,सिध्देश बिचोलकर यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली.
गायक गंधार देशपांडे यांनी सुरुवातीला अभिजात भारतीय संगीतामधील राग यमन मनमोहन शाम ताल झपतालात सादर केला . त्यानंतर गुरु आणि वडील पं.राम देशपांडे यांनी रचलेली बंदीश गणराज आयो है अप्रतिम सादर करत पंढरपूरकर रसिक श्रोत्यांना दमदार शास्त्रीय गायनाची भुरळ पाडली.त्यानंतर आई देशपांडे यांनीही पद्मनाभा नारायणा आणि भेटी लागी जीवा अभंग गायन करत विठूराया चरणी गायन सेवा केली. त्यानंतर अबीर गुलाल उधळीत रंग ,बोलावा विठ्ठल संतरचना सादर करत शेवटी आम्हीं बी घडलो तुम्ही बी घडाना भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
त्यांना तितकीच सुंदर आणि साजिशी साथसंगत तबला स्वप्नील भिसे ,हार्मोनियम सिध्देश बिचोलकर ,पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे ,टाळ सुदर्शन कुंभार, तानपुरा ओम देशमुख यांनी केली.कार्यक्रम अविस्मरणीय लक्षात राहील असा झाला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले. यावेळी भाविक व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.असेच सुंदर कार्यक्रम सादर करावेत अशी रसिक श्रोत्यांनी विनंती करत भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत. पुढे दोनही दिवस ख्यातनाम कलाकारांच गायन ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने करण्यात आले आहे.