भालचंद्र विरेंद्र पाटील : सभेचा माजी विद्यार्थी ते अध्यक्ष एक प्रेरणादायी प्रवास..!

मा.भालचंद्र विरेंद्र पाटील(साहेब) : सभेचा माजी विद्यार्थी ते अध्यक्ष एक प्रेरणादायी प्रवास..!

सव्वाशे वर्षे अविरतपणे जैन समाजाच्या चौफेर प्रगतीचे कार्य करणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती व सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष मा. भालचंद्र विरेंद्र पाटील यांची एकमताने निवड झाली.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा लेख….

आदर्श नेता हा संवेदनशील, नीतीमान, सुसंस्कृत, दुसऱ्यांचे ऐकून घेणारा, सेवाभावी व निःस्वार्थी, लोकशाही मार्गाने सर्वांना बरोबर घेऊन संस्था चालवणारा असतो. आणि हे सारे गुण भालचंद्र पाटील साहेब यांच्या ठायी आहेत. त्यामुळे दक्षिण भारत जैन सभेचा आणि जैन समाजाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष म्हणून पूज्य लक्ष्मीसेन व जिनसेन भट्टारक, मुनी व ब्रम्हचारी, विद्वान पंडीत, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यापारी, उद्योगपती , जमीनदार यांनी यापूर्वी नेतृत्व केले आहे.

सभेचे नेतृत्व केलेले स्व. रावसाहेब पाटील (दादा) आणि कल्लाप्पाण्णा आवाडे दादांचा विश्वास व आशीर्वाद आणि माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार प्रकाश आवाडे यांचे सहकार्य लाभलेले भालचंद्र पाटील यांची सभेच्या अध्यक्षस्थानी निवड करुन सभेने उचित निर्णय घेतला आहे.विविध समाजोपयोगी कार्य करणारा कर्तबगार नेता म्हणून भालचंद्र साहेबांना सारे ओळखतात ते केवळ जैन समाजासाठी नव्हे तर बहुजन समाजाच्या भल्यासाठी सतत काम करत असतात.

मौजे डिग्रजच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक तर माध्यमिक शिक्षण महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूलमध्ये आणि उच्च माध्यमिक शिक्षण सांगली हायस्कूलच्या टेक्निकल विभागात पूर्ण करुन लठ्ठे पाॅलिटेक्निक मध्ये डिप्लोमा इंजिनिअर झाल्यावर कांही काळ इंजिनिअर म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे नोकरीही केली आहे.
कुपवाड एमआयडीसीत स्कायलार्क उद्योग सुरु केला. त्यांनी आवाडे दादांच्या जवाहर साखर कारखान्याची यंत्रसामग्री उभी करुन या उद्योगात पदार्पण केले व त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांची यंत्रसामग्री प्रकल्प उभारणी करुन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योगदान दिले आहे.
भालचंद्र साहेब हे १९८१ ते १९८६ या काळातील सांगली जैन बोर्डिंगचे माजी विद्यार्थी. याच काळात त्यांचा वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या बरोबर संपर्क आला. त्यांच्या सेवाभावी व त्यागी वृत्तीने प्रभावित होऊन त्यांनी मौजे डिग्रज या त्यांच्या गावी वीराचार्य शिक्षण संस्था स्थापन करुन बहुजन समाजातील लेकरांचे नशीब घडवण्यासाठी शाळा सुरु करुन बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली.
सांगली हायस्कूलच्या प्रांगणात २०१० मध्ये दक्षिण भारत जैन सभेचे ९२ अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी दांडगा जनसंपर्क करुन अधिवेशनाला हजारोंचा जनसमुदाय जमवून ५१ लाखांचा निधी जमविला आणि सभेनं पद्माळे हद्दीत धनंजय गार्डन जवळ एक एकर जमीन खरेदी केली. दक्षिण भारत जैन सभेच्या कामात मोठ्या प्रमाणात समाजबांधवांना सहभागी होण्याची संधी देण्याचा प्रघात सुरु करण्याचे श्रेय भालचंद्र पाटील यांना जाते.
स्व. रावसाहेब पाटील दादांचा भालचंद्र साहेबांवर दांडगा विश्वास. ते दररोज त्यांना सकाळी साडे आठ वाजता फोन करुन दक्षिण भारत जैन सभेच्या कामाची विचारणा करत असत. दादांचे सुपुत्र अभिनंदन व उत्तम हे त्यांचे घनिष्ट मित्र आहेत. रावसाहेब दादांनी शिक्षण, आरोग्य व संस्कार ही त्रिसूत्री केंद्रस्थानी ठेवून सभेला मोठे करुन जैन समाजाची प्रगती केली. हीच त्रिसूत्री भालचंद्र पाटील साहेब यांची आहे.
आई विजया यांच्यावर त्यांची निस्सीम भक्ती आहे. गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका राहिलेल्या भगिनी स्व. सुरेखा चौगुले यांच्या बद्दल त्यांच्या मनात आत्यंतिक आदर भाव होता. थोरले बंधू श्री.सुरेश यांच्या उद्योगातील मार्गदर्शनाचा व सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख ते करतात. महिला मंडळात सेवारत आणि तीर्थाटन केलेल्या, गरजू गरीब लोकांना मदत करणाऱ्या धार्मिक धर्मपत्नी सौ. निलिमा यांची खंबीर साथ लाभली म्हणून पुत्र आशिष अमेरिकेत तर कन्या स्नेहल पुण्यात इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत आणि मी उद्योग सांभाळून सार्वजनिक जीवनात जनसेवा करत आहे असे सांगणारे भालचंद्र साहेब सुरुवातीला अपार्टमेंट मध्ये राहत होते. प्रारंभीच्या काळात अनेक खस्ता खात हार न मानता खंबीरपणे कष्ट करून शून्यातून विश्व निर्माण केले आहे असे सौ. निलिमा
सांगतांना आम्ही सद्गदित झालो.
कोरोना काळात अनेक जीवाभावाची माणसं सोडून गेली..म्हणून ते व्यथित झाले. महापूर आणि कोरोना महामारीत अनेकांना त्रास व नुकसान झाले म्हणून वाढदिवस साजरा न करणारा व सतत सार्वजनिक कामासाठी लोकांच्यात रमणारा अवलिया लोकसेवक म्हणजे भालचंद्र साहेब.

व्यवसायात आयतं कांही मिळत नाही.. परिश्रम आणि कौशल्य पणाला लावून यशस्वी होता येतं हे स्कायलार्क उद्योगातून नव्या पिढीला यशाचा मंत्र देणारा.. अपघात आणि कोरोनामधून सहिसलामत बाहेर पडून पुन्हा मोठ्या उमेदीने लोकसेवेला जुंपून घेणारा.. अंतर्बाह्य निर्मळ मनाचा उद्योगी समाजसेवक म्हणून भालचंद्र पाटलांना सारेच ओळखतात..!!
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रीकल्चर मुंबई या संस्थेच्या गव्हर्निंग कमिटीचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली. आता या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे स्वीकृत सदस्य म्हणूनही त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ते व सहकाऱ्यांनी मिळून सांगली डेव्हलपमेंट फोरमची स्थापना केली आहे . सांगली लगतच्या औद्योगिक क्षेत्राचा व शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी ही मंडळी झटत आहेत. ऑटोमोबाईल इंडस्ट्री, आयटी पार्क व हेवी इंजिनिअरींग या क्षेत्रात सांगली जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी त्यांचा खटाटोप आहे. सांगली – पेठ मार्गाचा विकास व सांगली जिल्ह्याचा विकास, कृषी उत्पादने निर्यातीतून महसूल वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सहकाऱ्यांची मजबूत टीम बांधणी करुन औद्योगिक विकासासाठी ते कटीबध्द आहेत.

बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, लहान मुलांच्या वर चांगले संस्कार होण्यासाठी गाव तेथे पाठशाळा सुरु झाल्या पाहिजेत. जनतेचं आरोग्य चांगले रहावे, मंदिरं आणि पूजेवर होणारा अवाढव्य खर्च सिमीत करुन शिक्षण, आरोग्य व सुसंस्कारावर अधिक खर्च केला पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. रावसाहेब दादांसारखेच हे त्यांचे समाजभान व समाजहित अधोरेखित करणारे नेतृत्व समाजाला विधायक वळण देणारे नक्कीच आहे.

कोरोना काळात दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून कोविड हाॅस्पिटल मधून अनेक रुग्णांना जीवदान दिले व महापूर काळात मा. जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे २००० किलो खाद्यतेल दिले. या कामी पदाधिकाऱ्यासमवेत त्यांचा पुढाकार लक्षवेधी आहे.महापूर काळात त्यांनी मंत्रीमहोदयांचा पूरग्रस्त भागात दौरा घडवून आणला व जनतेच्या झालेल्या नुकसानीची माहिती देऊन मदत मिळवून दिली.

शिवाजी विद्यापीठात भ. महावीर अध्यासनाला दोन एकर जागा आणि इमारत बांधकाम व अध्यासनाच्या विकासासाठी भरीव निधी मिळण्यासाठी द. भा. जैन सभेच्या पुढाकाराने ना. अजितदादा पवार व ना. जयंतराव पाटील यांच्या समोर प्रस्ताव मांडून हे काम मार्गी लावण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे. शंभराव्या अधिवेशनात झालेले ठराव शासन दरबारी मांडण्यासाठी शासनासमोर जैन समाजाची कैफियत मांडली.

मौजे डिग्रज, नांद्रे व नावरसवाडी या भागातील जनतेला उपयोगी ठरणारे रस्ते, स्मशानभूमी, दलित हरिजन वस्ती रस्ते डांबरीकरण, हनुमान व विठ्ठल मंदिर, सोलर हायमास्ट, रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर व जनरेटर इ. कामासाठी ना. जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे ६ कोटीचा निधी खेचून आणला आहे.

जोडलेल्या दोन हातापेक्षा गरजू लोकांना मदत करणारे हात श्रेष्ठ असतात या विचाराने ते जनकल्याणासाठी झटतात. विकासकामासाठी राजकारणापलिकडे जाऊन सर्वपक्षीय आमदार, खासदार व मंत्र्यासमोर गार्‍हाणी मांडून समस्या सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

भालचंद्र साहेब गावाकडची नाती व माती जपणारे आहेत. मौजे डिग्रज मध्ये शाळा, वाचनालय, रस्ते, आरोग्य सुविधा, कामधेनू डेअरी या माध्यमातून गावचा विकास करण्यात त्यांचा पुढाकार लक्षवेधी आहे. याकामी श्रीपाल चौगुले, श्रीपाल बिरनाळे, गजानन लांडे, रमेश संभेकर, तानाजी जाधव,राजू बिरनाळे, बाळासाहेब पाटील, संदीप पाटील, शशिकांत सुर्यवंशी, सुनील फराटे व गावकऱ्यांची साथ मिळाली म्हणून गावासाठी थोडे फार करु शकलो असे ते स्पष्टच सांगतात.

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा खजिनदार म्हणून त्यांचे काम विकासाभिमुख आहे. सार्वजनिक संस्थांच्या भल्यासाठी ते प्रसंगी पदरमोडही करतात. जनसेवेसाठी सातत्याने मुंबई वारी करताना ते कधीच थकत नाहीत. बहुजन समाजातील विविध स्तरातील असंख्य जीवलग मित्रांचा गोतावळा त्यांनी जमवला आहे.

कर्मवीर आरोग्य अभियानांतर्गत रवी माणगावे आणि त्यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून अनेक गरजू गरीब रुग्णांसाठी मदत केली आहे.

दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशन आयोजनात त्यांनी परिश्रम घेतले आहेत. अधिवेशनानंतर सभेनं कर्नाळ रोडलगत तीन एकर जमीन घेतली आहे. त्या ठिकाणी आता सभेचे मध्यवर्ती कार्यालय, सांगली विभागातील शाखांची कार्यालये, मल्टीपर्पज हाॅल उभे करण्याचा संकल्प सभेनं सोडला आहे.आता हे काम भालचंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकर पूर्ण होणार आहे. त्यासाठी समाजाचा सहभाग त्यांच्या नेतृत्वाला उभारी देणारा ठरेल.

सांस्कृतिक भवन व कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलची उभारणी करुन बहुजन समाजाची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी ते सक्रिय झाले आहेत.कामाच्या व्यापात रात्री बारा वाजता झोपून पुन्हा सकाळी सहा वाजता उठून कामाला जुंपून घेणारा, साधू – साध्वी, भट्टारक पिठं, मंदीरं – तीर्थक्षेत्रं, समाज यांच्या प्रती आत्यंतिक आस्था व मदतीची भावना असलेले भालचंद्र साहेब हे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष झाल्याने समाज आनंदीत झाला आहे. आम्ही भालचंद्र साहेबांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

प्रा.एन.डी.बिरनाळे
सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top