ब्राझीलमध्ये विमान अपघातात 61 जणांचा मृत्यू, ज्यांचं हे विमान चुकलं ते काय म्हणाले?


nepal plane crash
ब्राझीलमधील साओ पाउलो येथे झालेल्या विमान अपघातात 61 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 57 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स प्रवास करत होते. अपघातग्रस्त विमानातील सगळ्यांचाच मृत्यू झाला आहे.

 

हे विमान ज्या कंपनीचं आहे, त्या वोपास एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, दुहेरी इंजिन असलेलं हे टर्बोप्रॉप विमान ब्राझीलच्या दक्षिणेकडील शहर पराना येथील कॅस्केवेल येथून साओ पाउलो शहरातील ग्वारुलहोस विमानतळाकडे जात होतं.

 

विन्हेडो शहराजवळ हे विमान कोसळल्याची माहिती या एअरलाईन्सने दिली आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ATR72-500 विमान फिरकी घेत सरळ जमिनीवर पडताना दिसत आहे.

 

स्थानिक अधिकाऱ्यांनी विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिलाय.

 

कास्कवेलमधील यूपेक्कन कॅन्सर हॉस्पिटलने सांगितले की, मृतांमध्ये त्यांचे दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टर देखील आहेत.

 

ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

साओ पाउलो राज्याचे गव्हर्नर टार्सिसो गोम्स डी फ्रीटास यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानाचे उड्डाण रेकॉर्ड सापडले आहेत.

 

2007 नंतर ब्राझीलमधील हा सर्वात मोठा विमान अपघात आहे. 2007 मध्ये साओ पाउलो येथे TAM एक्सप्रेस विमान अपघातात 199 लोक मरण पावले.

 

घटनास्थळी आगीचे लोट

या विमान दुर्घटनेच्या चौकशीत आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचं एटीआर या फ्रेंच-इटालीयन विमान कंपनीनं म्हटलंय.

 

विमान कोसळलं त्या भागातील एका घराचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

या दुर्घटनेचे व्हीडिओ समोर आले आहेत. आगीचे मोठमोठे लोट आणि मलब्यातून निघत असलेला धूर दुर्घटनास्थळी दिसत आहे.

 

विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्याच्या आसपास अनेक घरं असून दुर्घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन पथक उपस्थित असल्याचं दिसत आहे.

 

फ्लाइटरडार 24 या फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईटनुसार, या विमानाने शुक्रवारी 11 वाजून 56 मिनिटांनी कास्कावेल येथून उड्डाण केले होते आणि त्यानंतर दीड तासांनी त्याच्याकडून शेवटचा सिग्नल मिळाला होता.

 

हे विमान 2010 साली बनून तयार झाले होते आणि चांगल्या स्थितीत होते. विमान उड्डाणासाठीही अगदी योग्य मानले जात होते.

 

विमानचालक टीमकडे सर्व परवानेदेखील होते, अशी माहिती ब्राझीलच्या सिव्हिल एव्हिएशन एजन्सीने दिली.

 

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

“मी विमान कोसळण्याचा आवाज ऐकू आला, मी खिडकीतून डोकावून बघितलं, ते विमान माझ्या डोळ्यांसमोर जमीनदोस्त झालं.”

 

विन्हेडो शहरात राहणारी ही व्यक्ती आपला अनुभव सांगत होती, “विमान कोसळताना दिसताच मी घराबाहेर पळ काढला. मी खूप घाबरलो होतो, काय करावं काहीच कळत नव्हतं. भीतीने अंगणातील भींतीवरुन उडी मारली व घराबाहे पडले.”

 

दुर्घटनास्थळाच्या जवळच राहणारी नताली सिसारी म्हणाली, “मी स्वयंपाक करत होती, तेव्हा मला जोराचा आवाज ऐकू आला. मला वाटलं तो ड्रोनचा आवाज असेल, पण तितक्यात आणखी मोठा आवाज झाला.”

 

ती सीएनएन ब्राझीलशी बोलत होती, “मी धावत बाल्कनीत आले, ते विमान खूप वेगाने फिरत-फिरत खाली येताना दिसले. मला क्षणात जाणवलं की ही विमानाची सामान्य हालचाल नाही.”

 

अन्य एक प्रत्यक्षदर्शी पितरो रॉयटर्सशी बोलताना सांगितलं की, “तिथे खूप लोकं जमली आणि ते व्हीडिओ काढायला लागले. मी विमानाचा मलबा पाहिला. दुर्घटनास्थळी फक्त केबिनचे अवशेष दिसत होते.”

 

फ्लाईट चुकलं म्हणून वाचले!

या दुर्घटनाग्रस्त विमानाचे तिकीट काढलेल्या काही प्रवाशांचे उड्डाण चुकले होते.

 

विमान चुकलेल्या प्रवाशांपैकी एक असलेले ॲड्रियानो असिस म्हणाले, “विमान नेमका कधी उडणार आहे, याची निश्चित माहिती नव्हती. काऊंटरवरही त्याबद्दलची माहिती सांगायला कोणीच नव्हते. जेव्हा कुणी तिथे जाऊन विचारायचं, तेव्हा सांगितलं की आता विमानात चढता येणार नाही.”

 

असिस म्हणतात की, तिथे बसलेल्या काही लोकांशी माझी या मुद्द्यावरून चर्चाही झाली. पण मी देवाचे आभार मानतो की मी वाचलो.

 

दुसरा प्रवासी जोस फेलिपने सांगितले की, त्याने सुरुवातीला लतामला जाण्यासाठी तिकीट बुक केले होते. पण लतामचं विमानतळ बंद होता.

 

जेव्हा तो विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याला बोर्डिंग पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

 

यावरून तेथे बसलेल्या अधिकाऱ्यांशी भांडणही झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याला विमानात बसू दिले नाही.

 

“हा एक थरकाप उडवणारा अनुभव आहे. मी अजूनही थरथरत आहे. फक्त मी आणि देव या क्षणाचे साक्षीदार आहोत, असंही तो म्हणाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top