स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी गुणवंतांचा सन्मान सोहळा
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२४ – स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत यश संपादन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवार,दि.१३ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रेयश पॅलेस, कराड रोड, पंढरपूर येथे सन्मान सोहळा व मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक पै.दादासाहेब ओमणे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.इंद्रजीत देशमुख हे प्रमुख मार्गदर्शक असून उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना आणि पालकांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, विभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप,प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पंढरपूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातील सामाजिक, सांप्रदायिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या प्रतिष्ठानने अनेक कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी अशा स्वरूपामध्ये सन्मानित केले जाणार आहे.
तरी वरील पंढरपूर कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्वच शाळा कॉलेजचे संस्था पदाधिकारी,प्राचार्य मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.