शिवराज्याभिषेक सोहळ्यास तालुक्यातून वीस हजार मावळे जाणार
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 6 जून 350 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त किल्ले रायगड वर आयोजित विविध कार्यक्रमास पंढरपूर तालुक्यातून 20 हजार मावळे हजेरी लावणार असल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे महादेव तळेकर यांनी दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, संभाजी ब्रिगेडचे दीपक वाडदेकर, माजी नगरसेवक किरण घाडगे, मनसेचे शशिकांत पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे, शनी घुले आदी उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिवर्षी दि.सहा जून रोजी दुर्गराज रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त युवराज संभाजी छत्रपती महाराज मार्गदर्शक असलेल्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दि.पाच व सहा जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यंदा देखिल दि.पाच रोजी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन केले जाणार आहे. यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज हे पायी गड चढणार असून यानंतर महादरवाजा पूजन व तोरण बांधणे,धार तलवारीची युद्ध कला महाराष्ट्राची हा शिवकालीन युद्ध कलेचे सादरीकरण होणार आहे.
यानंतर जागर शिव शाहिरांचा याद्वारे स्वराज्याचा इतिहास सांगितला जाणार आहे. तसेच शिरकाई देवीचा गोंधळ व वारकरी संप्रदायाचे कीर्तन होणार आहे.
दि.सहा रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन,शाहीरी कार्यक्रम, सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे.यानंतर महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून सुवर्ण नाण्यांचा अभिषेक देखील केला जाणार आहे. यावेळी युवराज संभाजी छत्रपती उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा याचे सादरीकरण केले जाणार आहे.
या कार्यक्रमास पंढरपूर शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने युवक उपस्थित राहणार असल्याचे महादेव तळेकर यांनी सांगितले.