श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळे च्यावतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड सौ.धनश्रीताई घाडगे व अध्यक्षस्थानी सचिवा सौ सुनेत्रा ताई पवार या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. राजमाता जिजाऊ ,झाशीची राणी, राणी चन्नम्मा यांच्या वेशभूषा केलेल्या मुलींनी स्वगत सादर केले.

प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ विनय ननवरे व डॉ पुजा ननवरे यांच्या मातोश्री सौ कमल लक्ष्मण ननवरे ,श्री स्मरण उद्योग समूहाचे ऋत्विक लिंगे यांच्या मातोश्री सौ.राणी सुनील लिंगे ,रेल्वे अभियंता अक्षय मुळे यांच्या मातोश्री सौ शोभा श्रीहरी मुळे व दुबई येथे अभियंता असणारे परितोष निंबाळकर यांच्या मातोश्री सौ अंजली दिलीप निंबाळकर या कर्तुत्ववान मातांचा सन्मान सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड.धनश्रीताई घाडगे म्हणाल्या की, रवींद्रनाथ टागोर यांनी महिलां बाबत एका कवितेत म्हटले आहे की अर्धे विश्व महिला आहेत ,तर उर्वरित अर्धे विश्व महिलांमुळे आहे .भारतीय संस्कृतीत महिलांना मानाचे स्थान आहे.स्त्री व पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत.बदलत्या समाजव्यवस्थेत कौटुंबिक अत्याचार कमी झाले तरी अन्य ठिकाणचे वातावरण विचार करायला लावणारे आहे. संसारात, समाजात स्त्री व पुरुष या दोघांनी विवेकाने वागले पाहिजे. यावेळी त्यांनी महिला विषयक कायद्याची माहिती दिली व मनाचा, विवेकाचा कायदा सर्वोच्च असल्याचे सांगितले.
सचिवा सुनेत्राताई यांनी आज चार मातांचा सन्मान झाला आहे या ठिकाणी 40 मातांचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला लाभले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला .
यावेळी मुख्याध्यापक संतोष कवडे,लक्ष्मण ननवरे, सुवर्णा जगदाळे यांनी मनोगतं व्यक्त केली. सूत्रसंचालन अशपाक मुजावर यांनी केले.आभार आलनदीप टापरे सरांनी मानले.