उल्हासनगरमधील सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा..
मुलींसाठी समुपदेशन आणि कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे…उप सभापती नीलम गो-हे यांची मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना विनंती

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ :- उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत अधिक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावेत अशी विनंती विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे केली आहे.
उल्हासनगर मुलींच्या सरकारी निरीक्षणगृहा तून ८ मुली पळून गेल्या होत्या. याबाबत घटनास्थळी माहिती घेतली असता प्रामुख्याने मुलींना चांगले स्वच्छतागृह नाही, जेवणाची व्यवस्थित सोय नाही,राहण्यासाठी योग्य खोली नाही अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.या मुलींना स्थानिक अधिकाऱ्यांकडून वागणूक देखील व्यवस्थित मिळत नसल्याचे माझ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.या व अशा ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्याबाबतीत व्यवस्थित वागणूक मिळावी याकरिता उप सभापती डॉ नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महिला व बालविकास विभाग यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

उल्हासनगर निरिक्षणगृह येथे सध्या कार्यरत असलेल्या अधीक्षक व तेथील कर्मचारी व सेवक यांच्यावर कारवाई करून तेथून त्यांना तात्काळ दूर करावे. राज्यातील विशेषगृह अधिक्षकाचे पद हे जाहिरात काढून ठराविक काळासाठी भरणे आणि एकाच व्यक्तीची तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणत्याही परिस्थितीत नेमणूक न करता पदावरील व्यक्ती नामनिर्देशनाद्वारे बदलावेत.विशेष गृहातील सेवक दर तीन वर्षांनी बदलण्यात यावेत.
निरीक्षण गृहातील मुलींसाठी समुपदेशन आणि कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे आहे. त्याचबरोबर मुली व महिला पीडित व आरोपी वरील कोर्ट केसेस जलद गतीने चालवून निकाली काढाव्यात एका खोलीत मुलींची संख्या क्षमता ठरविणे, मुलींचे जगणे दर्जात्मक करणे,स्वच्छतागृहे व झोपण्यासाठी चांगले बिछाने,गाद्या व चादरी पुरविण्याच्या सूचना संबंधीतीत अधिकारी यांना तात्काळ देण्याची सोय करावी या प्रमुख मागण्यांचा समावेश विधान परिषद उपसभापती डॉ.गोर्हे यांच्या पत्रात करण्यात आला आहे.
