पंचकल्याण व महामस्तकाभिषेक पूजा महोत्सवास येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दक्षता घ्या-प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे
या महोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार असून भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सुक्ष्म नियोजन करा-आ.राजेंद्र पाटील यड्रावकर
कोल्हापूर /जिमाका : शिरोळ तालुक्यातील श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी येथे दिनांक १ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या पंचकल्याण व महामस्तकाभिषेक पूजा महोत्सवास येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी, ता.शिरोळ येथे दिनांक ०१ ते ०९ जानेवारी २०२५ या कालावधीत पंचकल्याण व महामस्तकाभिषेक पूजा महोत्सव संपन्न होणार आहे,या महोत्सवाच्या आयोजना बाबत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, शिरोळ हातकणंगलेच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, या महोत्सवाच्या ट्रस्ट चे अध्यक्ष, सचिव व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री.शिंदे म्हणाले, श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी येथे होणाऱ्या या महोत्सवात लाखो भाविक सहभागी होऊ शकतात.या सर्व भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य विषयक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या. वाहतूक व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करा. तसेच हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच या उत्सवासाठी लाखो भाविक येणार असल्याचे गृहित धरुन या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घ्या, असे निर्देश देवून जिल्ह्यात होणारा हा महोत्सव अत्यंत उत्साहाने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल,असे त्यांनी सांगितले.

आमदार श्री.यड्रावकर-पाटील म्हणाले, या महोत्सवासाठी विविध भागातून लाखो भाविक उपस्थित राहणार असून या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी सुक्ष्म नियोजन करा. तसेच त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या.
बैठकीत डॉ.संपत खिलारी यांनी पोलीस विभाग, जिल्हा परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा क्रीडा विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांशी संबंधित असणाऱ्या कामांचा आढावा घेतला.
सर्वांच्या सहकार्यातून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल, असे मौसमी चौगुले यांनी सांगितले.
राज्यासह परराज्यातून भाविक येणार असून त्यांना सर्व सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आली.