जे उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे मी जात नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11 – हवा कुठे वाहते हे मला चांगले कळते.कुणाची सत्ता येणार हे मला कळते.कोण जिंकणार आहे त्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी मी जातो.जे उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे मी प्रचाराला जात नाही.संजय निरुपम हे दिंडोशीत विजयी होतील म्हणून आपण येथे आलो आहोत.त्यामुळे हम नही किसिसे कम, जिंकून येतील संजय निरुपम असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.दिंडोशी येथील संतोषनगर मध्ये शिवसेना महायुती चे अधिकृत उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.

यावेळी उमेदवार संजय निरुपम,आमदार राजहंस सिंह, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुभाष कांता सावंत,रिपब्लिकन पक्षाचे हरिहर यादव,चंद्रकांत पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव,सोना कांबळे,संजय बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिंडोशी मतदारसंघात संतोषनगर आणि परिसरात आजपर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली गेली नाही याबाबत ना. रामदास आठवले यांनी आश्चर्य व्यक्त केले. मुंबई महानगरात असणाऱ्या दिंडोशित 15 दिवसांनी रहिवासियांना पाणी मिळते,वीज पुरवठा नाही,रस्ते नाहीत.या भागात वन विभागाच्या जमिनीवरील झोपड्यांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत ते मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महायुती उमेदवार संजय निरुपम यांना पाठिंबा आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टीवासियांना तीनशे फूट घर दिले होते ते अत्यंत छोटे घर आहे.एसआरए योजनेत झोपडीवासियांना किमान साडे चारशे फूट कार्पेट एरिया आणि 600 फूट बिल्ट अप एरिया चे घर द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याचे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
युती ची महायुती करण्यात रिपब्लिकन पक्षाचा आहे मोठा वाटा पण जागावाटपात रिपब्लिकन पक्षाला दिला जात नाही वाटा; तरी महायुती च्या विजयात असेल रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा मोठा वाटा अशा अनेक कवितांची रेलचेल ना.रामदास आठवले यांच्या भाषणात होती.यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
