वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज – उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले
1 हजार 625 पोलीस अधिकारी व कर्मचारी
चार ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी माऊली स्कॉड
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10:- कार्तिक शुद्ध एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी असून या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी व वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी दिली.
कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 1 हजार 625 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.यामध्ये एक पोलीस अधिक्षक, एक अप्पर पोलीस अधिक्षक, 10 पोलीस उपअधिक्षक, 23 पोलीस निरिक्षक, 90 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक,1 हजार पोलीस कर्मचारी व 500 होमगार्ड,01 एसआरपीएफ कंपनी, दोन बीडीएस पथके नियुक्त करण्यात आले आहेत.

वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र,65 एकर,महाव्दार, महाव्दार घाट,पत्राशेड आदी ठिकाणी 10 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापन करण्यात आले असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.150 सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे.वाहतुक नियमनासाठी 13 ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर 16 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी व वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांनी केले आहे.