श्री विठ्ठल कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
श्री विठ्ठल कारखान्याने पुन्हा सुरु केली ऊसदराची स्पर्धा
वेणुनगर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ : श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याची अधिमंडळाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९.०९.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.सभेची सुरुवात जेष्ठ सभासदांचे हस्ते करण्यात आली.

कारखान्याचे कार्यलक्षी संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले. कारखान्याचे जनरल मॅनेजर डी.आर.गायकवाड यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.बी. पाटील यांनी विषय पत्रीकेवरील विषयांचे वाचन केले. या सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मतांनी हात उंचावून मंजूरी दिली.
या हंगामात येणाऱ्या ऊसास आपण ३५००/- रुपये ऊसदर जाहिर केला होता. त्यानंतर एका कारखान्याने १ रुपये जादा देवू अशी मोघम घोषणा केल्यानंतर त्यापेक्षा दोन रूपये आपण जादा देवू असे प्रति आवाहन केले.यामागे शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकविलेल्या ऊसाला जादा दर मिळावा ही एकच अपेक्षा आहे.मागील गळीत हंगामात आपण जादा दर दिल्याने सोलापूर विभागा तील शेतकऱ्यांना ६०० कोटीपेक्षा अधिकचा लाभ, विक्रमी उत्पादनासह सर्वोच्च ऊस दर जाहिर करून अन्य कारखानदारांवरही जास्त भाव देण्याचे नैतिक दडपण आणले. विभागातील सर्व कारखान्यात झालेल्या २१२ लाख मे.टन गाळपाला ३०० ते ४०० रुपये प्रति टन अधिकचा दर देण्याची वेळ आली.सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपये जादाचे मिळालेमुळे विभागातील सर्व शेतकरी आज आशिर्वाद देत आहेत. विठ्ठलच्या सभासदांनी संधी दिल्यामुळे हे शक्य झाले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने विठ्ठलचा सभासद जिंकला.

वेळप्रसंगी व्यक्तीगत राजकिय महत्वकांक्षा बाजुला ठेवून, जोखीम पत्कारून विठ्ठलच्या सभासदांचे हित अगोदर पाहिले. व्यक्तिगत पद,अधिकार यापेक्षा सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू दिला नाही.मतदार संघात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली, पण आपला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना ८००० मे. टनावरून १४००० मे. टन क्षमतेने येणारा हंगाम सुरु करेल. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करून व ३५००/- रुपये दर देवून नवा विक्रम प्रस्थापित करेल. यासाठी ६०० ट्रॅक्टर, ३०० मिनी ट्रॅक्टर व ३०० बैलगाडी करार करून एवढी यंत्रणा सज्ज केली आहे. कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून १२ टक्के वेतनवाढ लागू करणेत येईल.

सध्या जागतिक बाजार पेठेमध्ये साखरेचे दर ६५००/- ते ६८००/- रुपये असून केंद्र सरकारने साखर निर्यातीवर असलेली बंदी उठविण्यात यावी.तसेच शासनाने एफआरपी वाढविली मात्र साखरेच्या किमान विक्री दरामध्ये कोणताही बदल केला नाही. यामुळे साखर कारखान्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे या करीता साखरेवरील निर्यात बंदी उठवावी व साखरेची किमान आधारभुत किंमत रु.३८५०/- करावी, असे दोन ठराव सभेमध्ये मंजुर करुन केंद्र व राज्य शासनास पाठविण्यात यावे याकरिता सर्व उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
सध्या केंद्र शासन इथेनॉल निर्मिती करीता प्रोत्साहन देत असून त्यामुळे इथेनॉल प्रकल्प कार्यान्वीत झाल्यास उत्पादीत होणाऱ्या उत्पादनावर प्र.लिटर १० रुपयेच अधिकचा नफा मिळून शेतकरी सभासदास त्याचा फायदा होणार आहे. त्या अनुषंगाने इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरु करीत आहोत.
आपले कारखान्याचे कार्यक्षेत्रालगत असलेल्या गावामधून आपले कारखान्यास ऊस गाळपास येत असून त्या गावातील शेतकऱ्यांची सभासद करुन घेणे व त्यांचे गावांचा समावेश कारखाना कार्यक्षेत्रामध्ये करून घ्यावा म्हणून वेळोवळी मागणी होत आहे.त्यामुळे त्यांना सभासद केल्यास कारखान्याच्या भांडवलामध्येही बाढ होऊन कारखान्यास आर्थिक फायदा होणार आहे. त्यातूनच इथेनॉल प्रकल्पाची उभारणी करणेसही मदत होईल, त्यामुळे कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

या सभेसाठी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बब्रुवाहन राँगेसर, संचालक सर्वश्री संभाजी भोसले,कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे,सचिन वाघाटे,बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, जनक भोसले, प्रविण कोळेकर,नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती खटके, सौ.सविता रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव,अशोक तोंडले,अशोक घाडगे,अंगद चिखलकर, तानाजी बागल,सचिन शिंदे पाटील, समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे,एम.एस.सी. बँकेचे प्रतिनिधी सी.एस.पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कारखान्याचे माजी संचालक, सभासद, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सर्व उपस्थित सभासदांचे निमंत्रीत संचालक सचिन शिंदे-पाटील यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.श्री नागटिळक सर यांनी केले.