सरळसेवा भरती वनरक्षक 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत शुभम ज्ञानेश्वर कडू यांनी मिळवले यश
भोलावडे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०८/२४ -भोलावडे तालुका भोर जिल्हा पुणे येथील शुभम ज्ञानेश्वर कडू यांची वनरक्षक पदी निवड झाली. महाराष्ट्र सरकारच्या वनविभागा मार्फत घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती वनरक्षक 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत शुभम ज्ञानेश्वर कडू यांनी हे यश मिळवले.
शुभमचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण जिजामाता विद्यालय भोर येथे झाले. अकरावी बारावी सायन्स मधून राजा रघुनाथराव विद्यालय भोर येथे पुर्ण केले. त्यानंतर भोरमधील अनंतराव थोपटे महाविद्यालयात रसायनशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. हे शिक्षण घेत असताना भोर मधील ध्येय व संकल्प प्रतिष्ठान या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करु लागला.अभ्यासिकेमधे अभ्यास करुन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या वनरक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या आईची व वडिलांची इच्छा पूर्ण करून दाखवली.
शुभम याची घरची परिस्थिती सर्वसाधारण होती. वडील श्री. ज्ञानेश्वर कडू हे राजगड साखर कारखान्यात कामाला होते तसेच आई व इतर परिवार घरी शेती व पशुपालन करून कडू कुटुंब आपली उपजीवीका करत होते. शुभम चे वडील ज्ञानेश्वर कडू व चुलते संतोष कडू हे वारकरी संप्रदायात असल्यामुळे शुभम वर लहानपणापासूनच चांगले संस्कार झाले. कडू कुटुंबीय भोलावडे गावात एकत्र कुटुंब पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे. कुटुंबामध्ये असलेला जिव्हाळा आणि शुभमला कुटुंबाकडून मिळालेली साथ या यशामध्ये महत्वपूर्ण आहेत.
वनरक्षक म्हणून नुसती निवडच नाही तर जो जिल्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त कट ऑफ असणारा समजला जातो त्या जिल्ह्यातून शुभम ने पहिला क्रमांक मिळवला आहे. बरेच निकाल थोड्या फरकाने गेले होते पण त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेऊन प्रामाणिक मेहनत घेतली आणि त्याचे फळ त्याला मिळाले. निवड झाली असली तरी तो अजूनही इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.
शिक्षण घेत असताना आपल्या आई वडीलांनी आपल्याला घडवण्यासाठी घेतलेले काबाडकष्ट डोळ्यांपुढे ठेवून तसेच चांगल्या मित्रांची संगत धरली तर यश नक्की मिळते हेच शुभम ज्ञानेश्वर कडू याच्या यशामुळे अधोरेखित झाले आहे.