अन्यथा हमाल-तोलारांचे 10 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन -जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे
मागण्या त्वरीत मान्य करा
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०९/२०२४ – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व हमाल तोलार कामगारांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे. या आंदोलनातील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास 10 सप्टेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे हमाल तोलार बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे सोलापूर जिल्हा हमाल मापाडी, माथाडी, श्रमजिवी कामगार समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस शिवाजी शिंदे यांनी इशारा दिला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजाराकरिता लागू करण्यात आलेला टप्पा दुरूस्तीचा ठराव रद्द झाला पाहिजे, संपूर्ण माथाडी कामगाराच्या हमाली तोलाईचा भरणा माथाडी बोर्डात झाला पाहिजे,माथाडी कामगारांकरिता, घरकुल व प्राथमिक उपचार केंद्र झालेच पाहिजे, कांदा विभागामधील माल राखणे बंधनकारक करू नये तसेच भुसार व कांदा विभागामध्ये 50 किलोच्या भरतीचे नियमन असताना शेतकरी 60, 70, 80 किलो भरतीचे पोते बाजारात आणत आहेत ते त्वरित बंद झाले पाहिजेत अशा विविध मागण्या या आंदोलनामध्ये हमाल तोलार कामगारांनी मांडल्या आहेत.

या मागण्या कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंत्री यांनी ताबडतोब सोडविल्या पाहिजेत अन्यथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व हमाल तोलार, कामगार 10 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी प्रशासक मोहन निंबाळकर, मार्केट कमिटीचे सचिव दत्तात्रय सुर्यवंशी यांच्याशी हमाल तोलार कामगार बंधूची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रशासक मोहन निंबाळकर यांनी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्याबरोबर आपल्या मागण्या काय आहेत या माझ्या हातात असतील तर त्या मी पूर्ण सोडवितो. मात्र टप्पा पद्धत हे मात्र पणन मंत्र्यांच्या दालनात असल्याने यावर मी काहीही करू शकत नाही मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील टप्पा पद्धतीचे दर ज्या पद्धतीने असतील त्या पद्धतीने तुमचे दरवाढ मात्र मी शंभर टक्के करून देतो. यावर तुम्ही सर्वांनी चर्चा करून मला सांगावे. या सर्व मागण्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रशासक निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी हमाल पंचायतचे संचालक शिवानंद पुजारी,अमोल शिंदे, उपाध्यक्ष भीमराव सिताफळे, सिद्धु हिप्परगी, नागनाथ खंडागळे, चांदा गफार, किरण मस्के, महेंद्र चंदनशिवे, राजशेखर काळगी, शिवलिंग शिवपुरे, यास्मीन बागवान, हालू जमादार, सुनिता रोटे आदीसह हमाल-तोलार मोठ्या संख्येने उपस्थित होते.