तुमच्या नावाने असलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत सायबर भामट्याचा भयानक सापळा – ॲड. चैतन्य भंडारी

तुमच्या नावाने असलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत सायबर भामट्याचा भयानक सापळा – ॲड.चैतन्य भंडारी

धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वसामान्य माणसे पोलीस म्हटलं की निम्मेअधिक आधीच घाबरून जातात आणि त्यात परत तुमच्या नावावर अमली पदार्थ तस्करी असं काहीतरी सांगितलं की समोरच्याचे उरले सुरले धैर्य पण गळून जाते हे सायबर भामट्यांना माहित असते.

त्याचाच फायदा घेऊन ते लोक तुम्हाला जाळ्यात खेचतात आणि मग तुम्ही समोरचा जे जे काही सांगेल ते भीतीपोटी करत जाता आणि शेवटी लाखो रुपये तर लुटले जातातच शिवाय शारीरिक शोषणाला सामोरे जावे लागते त्यातून पुढे मग इमोशनल ब्लॅक मेल करून पुन्हा पैसे उकळले जातात. तर आधी समजून घ्या की हा अमली पदार्थ पार्सलचा सापळा आहे कसा ?

तर तुम्हाला एक फोन येतो की,आम्ही विमानतळावरील अमली पदार्थ नियंत्रण कक्षातून अमुक तमुक निरीक्षक बोलतोय आणि तुमच्या नावाने एक पार्सल परदेशात पाठवलं जात आहे. त्याचा आम्हाला संशय आल्याने स्कॅन केले असता त्यात अमली पदार्थ तसेच बनावट पासपोर्ट आणि काही सिमकार्ड सापडले आहेत. असा कॉल ऐकल्यावर कुणीही माणूस घाबरुन जातो.मात्र नंतर आठवून आठवून पाहिल्यावर आपण असं काही पार्सल पाठवलेलं नाही हे आठवत आणि तुम्ही नेटाने त्याला सांगता की, नाही, मी कसलेच पार्सल पाठवलेलं नाही आणि फारतर फोन ठेवून देता. मात्र थोड्या वेळाने पुन्हा वेगळ्याच नम्बरवरून कॉल येतो आणि दरडावणीच्या सुरात पलीकडचा माणूस म्हणतो की,आमच्या निरीक्षकाने तुम्हाला केलेला कॉल तर तुम्ही कट का केला. मी वरिष्ठ निरीक्षक अमुक तमुक बोलतोय आणि जर तुमचे हे पार्सल नाहीय तर ते सिद्ध करावे लागेल तुम्हालाच,कारण तुमच्या सर्व डिटेल्स त्यावर आहेत. तरी तुम्ही नाही पाठवलं म्हणताय तर मग जवळच्या पोलीस चौकीत जाऊन त्यांचे तसे प्रमाणपत्र घेऊन या आणि आम्हाला ते व्हाट्स अप करा, असे सांगितल्यानंतर तुम्ही पुरते घाबरून जाता आणि तितक्यात तिसऱ्याच नम्बरवरून कॉल येतो आणि मी पोलीस इन्स्पेक्टर अमुक तमुक बोलतोय आणि तुमच्याबद्दल आमच्याकडे अमली पदार्थ पार्सल संदर्भात तक्रार आलेली असून तुम्हाला अटक करावी लागणार आहे.

असं म्हणत तुम्हाला अगदी पोलिसी खाक्यात दरडावत बोलून पूर्ण गर्भगळीत करून टाकलं जात आणि मग त्यातून सुटण्यासाठी तो समोरचा जे जे सांगेल ते ते तुम्ही करत जाता,. त्यात सुरुवातीला पैसे उकळले जातात आणि आता या भामट्यांचा निर्लज्जपणा इतक्या टोकाला गेला आहे की ते लोक तुम्हाला व्हिडीओ कॉल करायला भाग पाडून थर्मल इमेजिंग स्कॅन करायचे आहे असले काहीतरी टेक्निकल शब्द वापरून तुम्हाला चक्क कपडे उतरवायला सांगितले जातात आणि त्याचे तिकडे ते लोक शूट करून घेतात आणि कॉल कट केला जातो.

तुम्हाला वाटलं थोडक्यात वाचलो. पण तसे नसते. तर काही दिवसांनी वेगळ्याच नम्बरवरून तुम्हाला तुमचाच तो व्हिडीओ पाठवून अमुक इतके पैसे पाठवा नाहीतर हा व्हिडीओ तुमच्या नातेवाईकांना तर पाठवूच शिवाय सोशल मिडियावरही व्हायरल करू असं धमकावलं जात.आता मात्र तुम्ही पूर्ण घाबरून जाता आणि पुन्हा पुन्हा पैशाने लुटले जाता.

इतका भयानक हा सापळा आहे. तुम्ही म्हणाल की मग आता यावर उपाय काय. तर उपाय सोप्पा आणि तितकाच प्रभावी आहे.मुळात हे लक्षात ठेवा की,ते ज्या कक्षातून / ऑफिसातून बोलतोय असं सांगतात ते मुळात अस्तित्वातच नसते आणि अमली पदार्थ संबधी जे अधिकृत शासकीय विभाग आहेत त्यांच्याकडून कधीही कोणालाही असा फोन जात नाही. ते थेट तुमच्या घरीच येऊन धडकतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा असा काही कॉल आला तर अजिबात घाबरू नका आणि त्याला एंटरटेन पण करू नका. तुला काय करायच ते कर असं म्हणा.असं तुम्ही म्हटला की ते भामटेनंतर तुमच्या नादाला लागत नाहीत आणि तरी पुन्हा कॉल आले तर सरळ ते नंबर ब्लॉक करून टाका. व्हिडीओ कॉलवर तर अजिबात जाऊ नका. काहीही झाले तरी आणि फारच वाटलं तर 1930 या नम्बरवर तुमची तक्रार दाखल करा. तुमच्यावर मानसिक आक्रमण कसे करायचे आणि जणू हिप्नोटाईज करून तुमच्याकडून हवे ते करून घ्यायचे हे त्यांना माहित असते. त्यामुळेच तर भले भले शिकलेले लोक सुद्धा यात अडकत आहेत. त्यामुळे बेफिकीर राहू नका. सावध राहा. सुरक्षित जगा असे आवाहन सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी व डॉ.धनंजय देशपांडे पुणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top