पंढरपुरातील पूरग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत
जनसेवा प्रतिष्ठानच्या मागणीची तहसिलदार यांनी घेतली दखल
भिमा नदीकाठच्या बाधितांच्या घरांचे पंचनामे करण्याचे दिले आदेश
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – उजनी धरणातून भिमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पंढरपूर शहरातील काही भागात पूरस्थिती निर्माण झालेली होती यामुळे भिमा नदीकाठच्या सखल भागातील काही घरांमध्ये पुराचे पाणी आले होते.यामुळे या भागातील अनेक कुटूंबियांना या भागातून प्रशासनाने दुसरीकडे स्थलांतरीत केले.आता भिमा नदीला आलेला पूर ओसरला आहे व नदीची पाणी पातळी देखील कमी झालेली आहे. या पुराने बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून पूर बाधित असणाऱ्या कुटूंबियांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माने यांनी पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांना निवेदनाद्वारे केल्यानंतर त्याची दखल घेण्यात आलेली आहे.
पंढरपूरचे नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजयकुमार जाधव यांनी सर्व मंडळ अधिकारी यांना आदेश दिला असून पुराने बाधित झालेल्या भिमा नदी काठच्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे करून अहवाल तहसिल कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भिमा नदी काठच्या भागातील नागरिकातून जनसेवा प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत.
यावेळी निवेदन देताना महादेव अहिरे, प्रकाश जाडकर, स्वप्निल गोंजारी, संजय खराडे, रामा करंडे, कल्याण लेंडवे आदि उपस्थित होते.