NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात उठवला आवाज
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक कारवाईचे दिले आश्वासन
नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/१२/२०२५ – हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या,वेतनातील विलंब, नियमितीकरण आणि इतर मूलभूत सुविधांबाबत आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात जोरदारपणे आवाज उठवला.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा, वेतनाचा विलंब, थकीत पगार, विमा संरक्षण आणि भविष्य निर्वाह निधी यांसह महत्त्वाच्या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधत आ.समाधान आवताडे यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताची ठाम भूमिका मांडली.
सभागृहात आवताडे यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे :
NHM कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा 4 नोव्हेंबर 2025 चा निर्णय प्रत्यक्षात का अंमलात आला नाही?
सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना आलेल्या संकटाची जाबजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
विमा संरक्षण, PF, लॉयल्टी बोनस यांसारखे मान्य लाभ अंमलात येण्यास विलंब का?
मागण्या प्रलंबित ठेवणाऱ्या समितीची प्रगती काय? शासनाने कालमर्यादा ठरवली आहे का?
आवताडे यांनी सांगितले की,कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह उपासमारीला सामोरे जात आहेत; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.

राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर देताना सांगितले की शासन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत पूर्ण संवेदनशील आहे.NHM कर्मचाऱ्यांची सेवा आणि योगदान शासन विसरलेले नाही.सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून संबंधित खात्यांशी बैठक झाल्याची माहिती दिली. शासन लवकरच कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देईल, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
आमदार आवताडे यांची प्रतिक्रिया-
आ.समाधान आवताडे यांनी सरकारच्या प्रतिक्रियेचे स्वागत करताना सांगितले की,आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेले उत्तर समाधानकारक असून NHM कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत करणारे आहे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हे कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध आहेत.
