प्लास्टिकमुक्तीसाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम – मशीनमध्ये क्वाईन टाका आणि कापडी बॅग घ्या…
गोपाळपूर ग्रामपंचायतीचा प्लास्टिकमुक्तीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उपक्रमाची अंमलबजावणी
पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज : प्लास्टिकमुक्त गावाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत गोपाळपूर ग्रामपंचायतीने कापडी बॅग वेंडिंग मशीन बसवून एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.मशीनमध्ये 5 रुपयांचे कॉइन टाकले की कापडी पिशवी मिळते, असा पर्यावरणपूरक उपक्रम ग्रामस्थांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी यशदा अंतर्गत प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी व पोलिस उपअधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्लास्टिकवर नामी शक्कल…!
गोपाळपूर तिर्थक्षेत्र असल्याने भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे प्लास्टिक कचरा वाढत होता.यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने या वेंडिंग मशीनची कल्पक शक्कल लढविली.गटविकास अधिकारी अमोल जाधव यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले.आषाढी वारीदरम्यान सिईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते प्लास्टिक बाटली क्रश मशीनचेही उद्घाटन झाले होते.

प्लास्टिक टाळा,कापडी बॅग वापरा – डॉ. कलशेट्टी
डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ग्रामस्थांना संदेश देत सांगितले,प्लास्टिक वापर टाळा,कापडी बॅगचा पर्याय निवडा. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत सांगितले की,एखाद्या पंचायतीने मनावर घेतले तर गावात किती सकारात्मक बदल घडू शकतो याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे गोपाळपूर ग्रामपंचायत आहे.या कार्यक्रमात त्यांनी सर्व नागरिकांना प्लास्टिकमुक्तीची शपथ दिली.
यावेळी सरपंच पांडुरंग देवमारे, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती पाटील,सदस्य उदय पवार,सविता आसबे आणि
प्रशिक्षणार्थी अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
