पंढरपूर नगरपरिषद निवडणूक Pandharpur election : २ डिसेंबरला मतदान,२८ नोव्हेंबरला EVM सीलिंग प्रक्रिया सुरू – डॉ.सीमा होळकर यांची महत्त्वपूर्ण माहिती
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : २८ नोव्हेंबरला मतदान यंत्रांची तयारी; उमेदवार व प्रतिनिधींना अनिवार्य उपस्थित राहण्याचे आवाहन
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. २५ नोव्हेंबर २०२५ — पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) तयार करण्याची प्रक्रिया दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होणार आहे. सकाळी १०.०० वाजल्यापासून शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे ही प्रक्रिया पार पडणार असून निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी या ठिकाणी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.
नगरपरिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून मतमोजणी दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वसनीय राहण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रानुसार EVM आणि VVPAT मशीनचे प्रभागनिहाय सीलिंग आणि तयारी करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेदरम्यान उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने मतदान यंत्रांची पारदर्शक तपासणी, मशीनची पडताळणी आणि सीलिंग कार्य खुलेपणाने पार पडते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम राहात नाही, असेही त्यांनी सांगितले.

तसेच मतदान यंत्र तयारी केंद्रामध्ये प्रवेशासाठी पंढरपूर नगरपरिषद कार्यालयातील ओळखपत्र कक्षातून ओळखपत्र घेणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असा कडक इशाराही निवडणूक प्रशासनाने दिला आहे.
नगरपरिषद निवडणुकीचे सर्व टप्पे सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावेत यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून संबंधित सर्वांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
