सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

प्रभारी मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/११/२०२५ –सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा प्रभारी मोहन जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,आगामी महानगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. प्रत्येकाने मतदार यादीची तपासणी करून संघटन अधिक मजबूत करावे.आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मागणीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोहन जोशी होते.

यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे,माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते,माजी महापौर संजय हेमगड्डी,आरिफ शेख,अलकाताई राठोड, सुशीलाताई आबुटे,माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी,विनोद भोसले, नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे,माजी नगरसेविका फिरदौस पटेल,परवीन इनामदार,अनुराधा काटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला, युवक व अल्पसंख्याक विभागाचे नेते उपस्थित होते.

यावेळी मोहन जोशी म्हणाले की,आपले नेते राहुल गांधी यांनी देशातील मतचोरीचे डाव उघड केले आहेत.नरेंद्र मोदी मतचोरी करून पंतप्रधान झाले आणि देवेंद्र फडणवीस मतांवर दरोडा टाकून मुख्यमंत्री झाले अशा परिस्थितीत लोकशाहीचे रक्षण करणे ही काँग्रेस कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. काँग्रेसने नेहमीच सामान्य माणसासाठी, शेतकरी, कामगार आणि गरीबांसाठी लढा दिला आहे.आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सोलापूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे.

बैठकीदरम्यान शहरातील विविध प्रभागांतील संघटन स्थिती, मतदार यादी तपासणीचे काम तसेच प्रचार नियोजना वरही चर्चा झाली.अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना, सूचना व अपेक्षा प्रभारींना मांडल्या.

यावेळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top