आर्यनंदी परिवाराचा शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळावा 2025 उत्साहात संपन्न
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळावा 2025 हा रविवार दि.17/08/2025 रोजी सोलापूर शहरातील मयूर क्लासिक मल्टीपर्पस हॉल इंचगिरी मठ जवळ,विजापूर रोड, सोलापूर येथे भव्य पद्धतीने पार पडला.
सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत काळे स्वीय सहा.मा.केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री,भारत सरकार हे उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प. पू.108 आचार्य आर्यनंदी महाराजांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन किशोर शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणुन सौ.रूपाली श्रीकांत काळे (संचालक– सिस्माटिका मेकाट्रोनिक्स प्राइवेट लिमिटेड),चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक सौ.नेहा किशोर शहा, तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र अध्यक्ष मिहीर गांधी,रवी मसालेचे फुलचंद जैन,संजय शरदचंद्र गाधी (अध्यक्ष- गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान),आशिष कोठारी (जैन सामाजिक कार्यकर्ते, नागेश्वर इलेक्ट्रिक),डॉ.राजेश र.फडकुले (संस्थाध्यक्ष आर्यनंदी परिवार),प्रेमचंद मेने (मेळावा अध्यक्ष), बाहुबली दुरूगकर (मेळावा सचिव) आदी उपस्थित होते.

आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले हे कार्यक्रमाचे प्रास्ताविकात म्हणाले की,या 15 व्या राज्यस्तरीय शुभमंगल सकल जैन समाज वधू-वर पालक परिचय मेळावा 2025 सोलापूर यात राज्यातील विविध भागातून आलेले उमेदवार व त्यांचे पालक या कार्यक्रमास उपस्थित राहिले. एकाच छत्राखाली अनेक वधू वर उमेदवार स्थळांची माहिती माफक दरामध्ये उपलब्ध करून देणे जेणेकरून सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले.आर्यनंदी परिवारातर्फे चालविण्यात येणाऱ्या आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था, आर्यनंदी निधी कंपनी, आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन,आर्यनंदी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आर्यनंदी मासिक या वेगवेगळ्या कार्यरत शाखांची माहिती दिली.
तदनंतर उपस्थित मेळावा अध्यक्ष श्री व सौ. श्रीकांत काळे,श्री व सौ.किशोर शहा सराफ यांना आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेश फडकुले यांच्या हस्ते भेट वस्तु, परिचय पुस्तिका, पुष्गुच्छ व पंचरंगी दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर शुभमंगल -सकल जैन समाज वधु वर पालक परिचय पुस्तिका- 2025 चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात श्रीकांत काळे म्हणाले की,जैन समाज हा अल्पसंख्यांक असून तोही विखुरलेला आहे.त्यामुळे असे वधु वर पालक मेळावे हे खूप मोलाची भूमिका बजावतात. अशा पद्धतीने वधू वर मेळावे होणे ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज ओळखून आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेश फडकुले यांनी हे खूप मोठे विधायक कार्य हाती घेतले आहे.त्यांच्या या समाजप्रधान कार्यास शुभेच्छा देतो. त्यांच्या आर्यनंदी परिवाराची भरभराट होवो ही आर्यनंदी महाराज चरणी प्रार्थना. नंतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यत केले.
या कार्यक्रमांमध्ये 238 वधू वर व त्यांचे पालक उपस्थित होते.सदर कार्यक्रमांमध्ये चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमास आर्यनंदी परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर मेळावा व्यवस्थित पार पडण्यासाठी मेळावा सचिव व संस्थेचे उपाध्यक्ष श्री व सौ बाहुबली दुरूगकर, संचालक निलेश एखंडे, श्री प्रवीण बुर्से, श्री व सौ वैभव आहेरकर, मोहनदास गुमते,विलास कटके,अनंत कुमार रणदिवे,सौ अनुपमा रणदिवे,जैन महिला मंडळ,आर्यनंदी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी यांच्या चोख नियोजनामुळे हा मेळावा अतिशय नेटकेपणा पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.मयुरी आनंद दुरूगकर यांनी केले.आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक निलेश एखंडे यांनी केले.
aryanandipariwar,jain,jainmarrige,
