भाविकांच्या मागणीमुळे टोकन दर्शन संख्येत वाढ – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

भाविकांच्या मागणीमुळे टोकन दर्शन संख्येत वाढ
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली माहिती

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यस्थिती विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

सध्या सुरू असलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून दर्शनासाठी व्यवस्थित रांगा, वेगवान गतीने होत असलेले संचलन आणि सुरळीत यंत्रणेमुळे अधिक भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता जाणवत होती.

त्यामुळे दर तासाला दिल्या जाणाऱ्या टोकन संख्येत 100 ने वाढ करताना भाविकांना अधिक सुलभतेने आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे हा हेतू आहे.एकूण 6 स्लॉटमध्ये प्रत्येकी 100 टोकन असे एकूण 600 टोकन पास वाढ करण्यात येणार आहे.21 जून ते 26 जून पर्यंत दर्शनासाठी वेळ, सुरक्षा आणि भाविकांच्या सोयीचा विचार करून ही सुधारणा करण्यात येत आहे.

राजेंद्र शेळके यांनी असेही स्पष्ट केले की, भाविकांनी अधिकृत टोकन ऑनलाईन प्रणालीद्वारेच बुक करावे व अफवांपासून दूर राहावे.ही व्यवस्था भाविकांच्या सुविधेसाठी असून यामधून अधिकाधिक लोकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येत्या काही दिवसांत आषाढी वारीची गर्दी वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर समितीकडून सतत दर्शन व्यवस्थेचा आढावा घेत योग्य त्या सुधारणा करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top