नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास
जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नांदेड/ ज्ञानप्रवाह न्यूज – नांदेड रेल्वे डिव्हिजन च्या अधिकाऱ्यांचा गलथानपणाचे आणखी उदाहरण समोर आले असून त्यांच्या विनंती वरून धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून एक महिन्यापासून रेल्वेनेच मागणी केल्यानंतर दिलेले वॉटर कुलर नांदेड रेल्वे स्थानकावर बसविण्यासाठी जागा द्यायला वेळ मिळत नसल्यामुळे दिलीप ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे .
याबाबत माहिती अशी की,साधारणत: चाळीस दिवसापूर्वी जेष्ठ समाजसेवक धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना नांदेड रेल्वे डिव्हिजन च्या कमर्शियल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांनी फोन द्वारे विनंती केली की, नांदेड रेल्वे स्थानकावर पिण्याचे थंड पाणी मिळत नसल्यामुळे प्रवाश्यांची अडचण होत आहे. त्यासाठी आपण पाणपोई लावून सहकार्य करावे.
यावर दिलीप ठाकूर यांनी असे उत्तर दिले की, तात्पुरती पाणपोई लावण्यापेक्षा कायम स्वरूपी वॉटर कुलर लावणे योग्य राहील. त्यावर त्या अधिकाऱ्याने हे तर आणखी चांगले असे सांगितले. त्यानंतर आणखी एका वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, पाण्याची अडचण असल्यामुळे वॉटर कुलर लवकरात लवकर बसवावा.मग दोन दिवसात दिलीप ठाकूर यांनी नविन वॉटर कुलर विकत घेऊन तो कुठे ठेवायचा याबाबत विचारणा केली.

वरिष्ठांना विचारून सांगतो असे म्हणत आठ दिवसाची वेळ निघून गेली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लेखी अर्ज देण्याची सूचना केली.दिलीप ठाकूर यांनी लेखी अर्ज देऊन एक महिना झाले तरी काहीही निरोप मिळाला नाही.याबाबत डिव्हिजन रेल्वे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला संबधित अधिकाऱ्याने दिला. दिलीप ठाकूर यांनी डीआरएम यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या स्वीय सहाय्यक यांनी डीआरएम व्यस्त असल्याचे सांगितले.त्यामुळे सदर प्रकरण खा. डॉ. अजित गोपछडे यांना सांगितले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन दिवसात जागा उपलब्ध करुन देतो असे त्यांनी खासदारांना सांगितले.
डीआरयुसी मेंबर अरविंद भारतीय यांनी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. तरी देखील काही उपयोग झाला नाही.आज दिलीप ठाकूर यांनी वाणिज्य अधिकारी यांना पुन्हा एकदा संपर्क साधला. तुम्हाला जागा उपलब्ध करता येत नसेल तर कशाला आधी मला सांगितले.त्यामुळे माझ्या पन्नास हजार रुपयाच्या वॉटर कुलरचा योग्य उपयोग होत तर नाहीच शिवाय मनस्ताप होत आहे.त्यामुळे नाईलाजास्तव मला वृतपत्राकडे जावे लागेल असे दिलीप ठाकूर यांनी सांगितले असता,त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा.यापुढे तुमचा फोन उचलणार नाही असे सांगितले.रेल्वे अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे दिलीप ठाकूर सारख्या जेष्ठ समाजसेवकाला जो मनस्ताप झाला आहे आणि प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी दिलीप ठाकूर यांनी रेल्वे मंत्र्याकडे केली आहे.
