गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा

गुलाल बुक्क्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२४ – येथे गुलाल, बुक्क्याची उधळण व दहीहंडी फोडून महाद्वार काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या हजेरी लावतात तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या व भाविक पंढरीचा निरोप घेतात. मात्र याच्या दुसऱ्या दिवशी पंढरपुरातील स्थानिकांचा उत्सव म्हणून महाद्वार काल्याकडे बघितले जाते. संत नामदेव महाराजांचे वंशज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. या खडावा हरिदास घराण्यात मस्तकावर धारण करून महाद्वार काला साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांना दिंडीचा मान असतो.

परंपरेप्रमाणे सोमवारी सकाळी 11 वाजता हरी महाराज नामदास हे दिंडी घेऊन काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर हरिदास घराण्यातील मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या खडावा पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली.

मंदिरातुन महाद्वार घाटाने चंद्रभागेच्या वाळवंटात तेथून कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळा,  मुक्ताबाई मठ मार्गे पुन्हा हा सोहळा काल्याच्या वाड्यात दाखल झाला. यावेळी ठिकठिकाणी गुलाल बुक्क्याची उधळण, पुष्पवृष्टी करून दहीहंडी फोडण्यात येत होती.यावेळी हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला.

महाद्वार काल्यानंतर आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते.

ज्ञानप्रवाह न्यूज संपादक डॉ राजेश फडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top