आषाढीचे यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पत्रकारांकडून सत्कार

आषाढीचे यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पत्रकारांकडून सत्कार

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०७/२०२४- यंदा पंढरपूर येथे विक्रमी भरलेल्या आषाढी यात्रेचे काटेकोरपणे नियोजन करणाऱ्या जिल्ह्यातील प्रशासनाचा पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पंढरीची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी मोठी अध्यात्मिक पर्वणी असली तरी प्रशासनासाठी मात्र एक मोठे आव्हान असते. राज्यभरातून येणाऱ्या पालख्या,विविध राज्यातून येणारे लाखो भाविक हे एकाच वेळी पंढरपूर शहरात दाखल झाल्यामुळे प्रशासनावर मोठा ताण असतो.मात्र नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा ताण प्रशासनातील सर्व विभागांना बरोबर घेऊन आषाढीच्या उत्कृष्ट नियोजनात बदलला.विशेष म्हणजे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांच्यासह प्रांताधिकारी सचिन इथापे,तहसिलदार सचिन लंगुटे, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ अर्जुन भोसले,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची पहिली आषाढी वारी असून देखील व यंदा विक्रमी वारकरी दाखल होऊनही नियोजनबद्ध हा भक्तांचा सागर व्यवस्थित हाताळला. 

यानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यासह प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगोटे, मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे आदींचा मंदिर समितीच्या नवीन भक्त निवासी येथे वारकरी उपरणे घालून सत्कार करण्यात आला.

हा सत्कार सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि मंदिर समितीचे कर्मचारी यांचाच असल्याची भावना या अधिकार्यांनी व्यक्त केली. भाविकांसह पंढरपूरातील नागरिक ,आलेले व्यापारी बांधव यांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले त्यामुळे ही आषाढी वारी स्वच्छ सुंदर आणि शांततामय वातावरणात पार पडली असे सांगून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापुढेही सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत भाविकांना आणि नागरिकांना व्यापार्यांना उत्कृष्ट सेवासुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी पत्रकार सुनील उंबरे यांनी माऊलीच्या रिंगणाचे काढलेले छायाचित्र देखील त्यांना भेट म्हणून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top