महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

पुणे / डॉ अंकिता शहा,दि.२५ एप्रिल २०२५ : महिला सक्षमीकरणासाठी जगभर एक दीर्घ आणि संघर्षमय प्रवास झाला आहे.आजच्या घडीला महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मागे पडलेले चित्र बदलण्यासाठी कौशल्य विकास आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे अत्यावश्यक आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. त्या सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि युनेस्को यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य करार (MOU) कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी सिम्बॉयसिस संस्थेचे आणि संस्थापक डॉ.एस.पी. मुजुमदार यांचे अभिनंदन केले आणि जागतिक पातळीवर शिक्षणाच्या क्षेत्रात या पुढाकाराचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात १९७५ साली आंतरराष्ट्रीय महिलादिनाची घोषणा झाल्यापासून सुरु झालेल्या लिंग समानतेच्या संघर्षाचा आढावा घेतला. महिलांना शिक्षण, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी विविध स्तरांवर कायदे आणि धोरणांमध्ये झालेले बदल त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी नमूद केले की, ग्लोबलायझेशनच्या काळात पारंपरिक कौशल्ये हरवण्याचा धोका निर्माण झाला असून, कौशल्य विकासाच्या नव्या दृष्टीकोनातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे अत्यंत गरजेचे आहे.

एआय,डिजिटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या प्रभावाखाली नवे तंत्रज्ञान आणि फ्लेक्सी वर्किंग तास या संकल्पना महिलांसाठी नवे दरवाजे उघडत आहेत हेही त्यांनी अधोरेखित केले. कोविड काळात बदललेल्या सामाजिक वास्तवावरही त्यांनी भाष्य केले. कोविड काळात शासकिय व खासगी क्षेत्रात वैद्यकीय संशोधन क्षेत्रात केलेल्या कार्याची डॉ.नीलम गोऱ्हेंनी प्रशंसा केली.

सरकारी यंत्रणांसोबत कार्य करत असताना, सायबर क्राईम वरील SOP तयार करणे, बाल अत्याचार पीडित मुलींशी संवाद साधताना पोलिसांची भूमिका , डिजिटल पुराव्यांचा योग्य वापर यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बाबी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मांडल्या. लिंग समानतेचा मुद्दा विचारधारा, सराव आणि कार्यान्वयन याच्या समन्वयातून साध्य करता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या समारोपात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येक युवक व युवतीने स्वतःचे कौशल्य वाढवत देशाच्या विकासात योगदान द्यावे असे सांगितले.
सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने डॅा.शां.ब. मुजुमदारांच्या मार्गदर्शनानुसार स्वाती मुजुमदारांच्या नेतृत्वाखाली शिक्षण,सामाजिक समता, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले .संस्थेला उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Back To Top