जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध मागण्या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला
टिकेकर वाडी मेगा टर्मिनलच्या ३५० कोटीच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात यावी,मोहोळ स्टेशन येथे सिध्देश्वर एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस सह इतर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा
सोलापूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे अंडरब्रिजमध्ये पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे तेथे कव्हरशेड करण्यात यावे
नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,29 मार्च 2025- सोलापूर जिल्ह्यातील आणि लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगल्या रेल्वे सुविधा उपलब्ध व्हाव्यात, प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद व्हावा,धार्मिक आणि औद्योगिक स्थळांशी जोडण्यासाठी आणि या भागाचा दळणवळणाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन देऊन महत्त्वाच्या रेल्वे मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सविस्तर चर्चा करत सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी विशेष आग्रह धरला. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या –
1) सोलापुर जिल्ह्यातील रेल्वे सेवेला अधिक वेग आणि सुरक्षितता देण्यासाठी टिकेकरवाडी मेगा टर्मिनलच्या 350 कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. मेगा टर्मिनल होणे अत्यंत गरजेचे आहे. मेगा टर्मिनल होण्यामुळे अनेक नवीन प्रस्तावित रेल्वे लाइन सुरू होतील, नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होतील, नव्या रेल्वे गाड्या सोडणे आणि त्या गाड्यांना शेवटचा थांबा देणे, रेल्वे गाड्यांची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छता, गाड्यांसाठी पार्किंग, अनेक नवीन फ्लॅटफॉर्म, मालवाहतुकीसाठी यार्ड यासारख्या अनेक सुविधा टर्मिनल मुळे मिळतील सोलापूरकरांसाठी दूरगामी आणि उपयुक्त ठरणार आहेत.

2) मोहोळ तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या,नागरिक आणि व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी, या भागात ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या तसेच मोहोळ तालुक्यातील तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी,कोरोना काळापासून बंद पडलेल्या मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेस,हुतात्मा एक्सप्रेस व इतर एक्सप्रेस गाड्यांचा कोरोना काळापासून बंद पडलेला थांबा कायमस्वरूपी सुरू करण्यात यावा.
3) सोलापूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे अंडरब्रिज मध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना येण्याजाण्यासाठी अडचण होत आहे. त्यामुळे तेथे कव्हरशेड करण्यात यावे.
या आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात असे खासदार प्रणिती शिंदे यांनी विनंती केली आहे .
यावेळी मोहोळच्या माजी नगराध्यक्षा शाहीन शेख, सीमाताई पाटील, ॲड श्रीरंग लाळे, सूरज शेख, विक्रांत दळवी, चंद्रकांत देवकते, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.