महिलांनी न्यूनगंडावर मात करत स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा आणि सर्व क्षेत्रांत पुढे यावे-डॉ.मैत्रेयी केसकर

जागतिक महिला दिनानिमित्त क.भा.पा. महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

महिलांनी न्यूनगंडावर मात करून स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा आणि सर्व क्षेत्रांत पुढे यावे

आर्थिक स्वायत्तता लाभलेल्या महिला स्वतःचा मानसिक, सामाजिक आणि शारीरिक विकास अधिक प्रभावीपणे करू शकतात-सौ.अश्विनी डोंबे

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून Accelerate the Action या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रुसा कंपोनंट आठ अंतर्गत महिला सक्षमीकरण कक्ष आणि लैंगिक छळ प्रतिबंधक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यशाळेचे उद्घाटन आदर्श विद्यालय, पंढरपूर येथील डॉ. मैत्रेयी केसकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनन्या क्रिएशन पुणे येथील सौ.अश्विनी डोंबे या होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.मैत्रेयी केसकर म्हणाल्या की, महिलांच्या सुंदरतेपेक्षा त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. महिलांनी न्यूनगंडावर मात करून स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा आणि सर्व क्षेत्रांत पुढे यावे.जिजाऊ,अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत महिलांनी त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सौ. अश्विनी डोंबे यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट केले.आर्थिक स्वायत्तता लाभलेल्या महिला स्वतःचा मानसिक,सामाजिक आणि शारीरिक विकास अधिक प्रभावीपणे करू शकतात. त्यामुळे महिलांनी उद्योग,व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील महिला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सफाई कामगार महिलांचा डायरी, पेन आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महिलांसाठी ज्वेलरी मेकिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले ज्यामध्ये मोत्याची नथ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नेहा देसाई यांनी केले.उपस्थितांचे स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल डॉ.विनया पाटील यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.सारिका भांगे आणि डॉ.भारती सुडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला सक्षमीकरण कक्ष व लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन डॉ.शिल्पा पवार यांनी केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील महिला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top