इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं.
हा अपघात जिथे घडला त्या परिसरात खराब वातावरण असल्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी येत होत्या. अखेर सोमवारी (20 मे) सकाळी हे कर्मचारी तिथे पोहोचल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितलं.
अनादोलू या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार, तुर्कस्तानने राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या शोध मोहिमेत मदत करण्यासाठी ड्रोन पाठवले होते.या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या ड्रोन फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी एका टेकडीवर काळ्या खुणा दिसल्या आहेत. या फुटेजमधून जी काही माहिती मिळाली आहे ती इराणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये एकही माणूस वाचल्याचे संकेत मिळाले नाहीत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळालं आहे.
इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीचे प्रमुख पिरहोसेन कोलीवंद यांनी या वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की घटनास्थळाची परिस्थिती ‘चांगली’ नाही.