डॉ.विनायक राऊत यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
परीक्षेच्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचून स्थिरस्थावर होऊन प्रश्नपत्रिका सोडवा

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-पंढरपूर येथील मानसोपचार तज्ञ व मनोबल क्लिनिकचे डॉ.विनायक राऊत यांनी नुकतेच दहावीच्या परीक्षेसाठी बसणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ.विनायक राऊत यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी, त्याचबरोबर अभ्यासक्रमाची उजळणी कशी करावी, अभ्यास करताना त्याचे नियोजन करून ते प्रत्यक्षात कसे आणावे,विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयीचा आत्मविश्वास कसा वाढवावा, विद्यार्थ्यांमधील असलेला अभ्यासाविषयीचा कंटाळा कसा कमी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रश्नपत्रिका सोडवताना प्रश्नांचा प्राधान्यक्रम,वेळेचे व्यवस्थापन, उत्तराचा मुद्देसूदपणा कसा असावा याबाबत सांगितले.

प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव किती महत्त्वाचा आहे हे सांगताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवताना कमीत कमी चुका होतील याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. ऐन परीक्षेच्या दिवशी मन, मेंदू आणि शरीर तरतरीत राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने सुयोग्य आहार आणि पुरेशी झोप महत्त्वाची असल्याचेही डॉ विनायक राऊत यांनी सांगितले.
परीक्षेच्या वेळेला ताण-तणाव येऊ नये म्हणून परीक्षेच्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचून स्थिरस्थावर होऊन प्रश्नपत्रिका सोडवताना उत्तरे लिहिताना कोणत्याही प्रकारची घाई न करता व्यवस्थितपणे प्रश्नपत्रिका सोडवावी असे सांगून डॉ. विनायक राऊत यांनी न्यू इंग्लिश स्कूल इसबावी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना नेमके व नेटके मार्गदर्शन करून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित असलेले पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ.पोटे व डॉ.डोके यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल इसबावीचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.