हंगाम संपत आला तरी एफआरपीपासून शेतकरी अद्यापही वंचितच
ऊसदराप्रश्नी प्रशासनाने हस्तक्षेप करावा, युवासेनेचे निवेदन..
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०१/२०२५- पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस दराचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. हंगाम सुरू होवुन तीन ते चार महिने उलटून देखील अद्यापही अनेक ऊस उत्पादक शेतकरी ऊस बिलापासून वंचित आहेत. ऊस गाळपास जावुन कित्येक दिवस होवुनही त्यांना एफआरपी रक्कम त्यांना मिळालेली नाही.शेतकरी बांधवांच्या याच प्रश्नाबाबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना शिवसेना युवासेनेचे सडेतोड वक्ते रणजित बागल म्हणाले की, ऊस गाळपाबाबत कारखान्यांची स्पर्धा पहायला मिळत आहे मात्र ऊसदराची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याच्या बाबतीत मात्र कारखानदार उदासीन असल्याचे पहायला मिळते आहे.

शेतकऱ्यांना ऊस गेल्यानंतर आता त्या क्षेत्रामध्ये पिक लागवडीला खर्च येणार आहे हा खर्च त्याला ऊसदर वेळेवर मिळाल्याशिवाय करता येणे अशक्य आहे. शिवाय एफआरपी रक्कम ही ऊस गेल्यानंतर ठराविक वेळेत मिळावी हा कायदा आहे. मात्र कारखानदारांनी या कायद्यास हरताळ फासण्याचे काम केले आहे.आता प्रशासनाने या प्रश्नी हस्तक्षेप करून कारखाना प्रशासनास शेतकऱ्यांची देणी देण्यास प्रवृत्त करुन बील देण्यास भाग पाडावे अशा आशयाचे निवेदन आज आम्ही देत आहोत असे रणजित बागल यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना श्री. बागल म्हणाले की, प्रशासनाने या प्रश्नी कठोर भुमिका घेणे गरजेचे आहे.तालुकाोओओो क्षेत्रातील ऊस गळित करणार्या सर्व कारखान्यांना गळित झालेल्या ऊसाची रक्कम लवकरात लवकर शेतकर्यांना देण्याबाबत कारखाना प्रशासन व कारखानदार यांना सुचना कराव्यात, प्रशासनाने यामध्ये लक्ष न घातल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू व शेतकर्यांना न्याय मिळवून देवू असे मत बागल यांनी व्यक्त केले.

प्रहार संघटनेचे गणेश कांबळे यांनी बोलताना सांगितले की ऊसदराबाबत प्रशासनाने बघ्याची भुमिका घेणे योग्य नाही शेतकऱ्यांचे हाल होणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही येत्या काळात शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवू असा इशारा दिला.
निवेदन तहसील प्रशासनाचे अधिकारी श्री.जाधव यांना देण्यात आले.यावेळी युवासेनेचे विरेंद्र शेंडे,निपोल कोळी, चेतन नेहतराव,हर्ष मोरे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.