वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्या साठी उपाययोजना-वनमंत्री गणेश नाईक

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई,दि.१४/०१/२०२५ – वन्यप्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत दिली.

वाघ तसेच बिबट्यांच्या झालेल्या मृत्यु प्रकरणी वनमंत्री श्री.नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जंगलांच्या कोर क्षेत्रात विविध प्रकारची फळझाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊन मांसाहारी प्राण्यांची देखील खाद्याची सोय होईल,असे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात 20 डिसेंबर तसेच 23 डिसेंबर 2024 रोजी 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू हा कोंबडीचे मांस खायला दिल्यामुळे झाले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कोंबडीच्या मांसामध्ये बुरशीजन्य विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार निलंबीत किंवा बडतर्फ करण्यात येईल,असे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

मंत्री श्री.नाईक म्हणाले की,ब्रम्हपुरी वन विभागाच्या शिंदेवाडी वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला असून या वाघाच्या शरिराचे सर्व अवयव सुस्थितीत होते.पांढरकवडा वन विभागाच्या वणी वनपरिक्षेत्रात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा शिकारीमुळे मृत्यू झाला. या वाघाचे शरीर पूर्णत: कुजलेले असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजले नाही. तथापि, वाघाच्या शरीरातील दात तसेच नखे गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणावर वन विभाग नजर ठेऊन तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जंगलामध्ये लागणारी आग विझविण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. या विषयासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यांचा अभ्यासही करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा शासन विचार करत आहे. तथापि, बफरझोनमध्ये कोणत्याही व्यक्तीने जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, वनसफारी करतांना काही पर्यटक वन्य प्राण्यांची वाट रोखून त्यांना पाहत असल्याने दिसून आले. यावरही वन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वनमंत्री श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top