ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई,दि.३१ : येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी, या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री.गोरे मंत्रालयात मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,आमदार सचिन कांबळे- पाटील,श्री.गोरे यांच्या पत्नी सानिया गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

१०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून राज्याला प्रथमच २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे.१०० दिवसात या घरांना मान्यता देवून कामे चालू करण्यात येतील. तसेच प्रधानमंत्री यांची महत्वाकांक्षी लखपती दीदी योजना १०० दिवसात राबविण्याचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दीदी करणार असल्याचेही मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासविषयक विविध संकल्पना राबवून विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top