सर्वांगीण व चौफेर प्रगतीसाठी मुस्लीम खाटीक बांधवांनी आत्मभान वाढीस लावावे – सादिक खाटीक,असिफ कलाल,बाबू खाटीक
आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१२/२०२४ – शैक्षणिक, सामाजिक,आर्थिकदृष्ट्या सर्वांगीण व चौफेर प्रगतीसाठी मुस्लीम खाटीक समाजाने छोट्या छोट्या उपक्रमाद्वारे आत्मभान वाढीस लावावे असे आवाहन कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक, कुरेश कॉन्फरन्सचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष इंजिनियर असिफ कलाल आणि पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस असिफ खाटीक यांनी केले .

इंजिनियर असिफ कलाल यांच्या कल्पनेनुसार आज असिफ निजाम कलाल,रमजान निजाम कलाल या बंधूंच्या निवास स्थानाच्या परसात नारळाचे झाड लावून आणि वसिम रशिद कलाल,इंजिनियर रईस रशिद कलाल यांच्या निवासस्थानी कुरेश कॉन्फरन्सच्या नावच्या बचतीच्या डब्याद्वारे छोट्या बचतीच्या माध्यमातून समाजहीत साधण्याचा प्रयोगाला आज मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करणेत आली. त्यावेळी सादिक खाटीक,असिफ कलाल,असिफ उर्फ बाबू खाटीक यांनी हे आवाहन केले .
मुस्लीम खाटीक समाज सर्वच विकास प्रवाहाच्या दृष्टीने खुप मागे पडलेला आहे . शिक्षणातील प्रचंड घसरण,व्यवसायातील ससेहोलपट आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड मागासलेपण घेऊन वाटचाल करीत असलेल्या या समाजबांधवांनी छोट्या छोट्या उपक्रमाद्वारे स्वतःला सावरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.घरा समोरील मोकळ्या जागेत, गच्ची – टेरेसवर किंवा बाल्कनीत विषमुक्त भाजीपाला मिळविता येतो,भोपळा,काकडी, मिरची, पालक,टोमॅटो,दोडका,कोथिंबीर वगैरे आणि इतर फळ, सुगंधी फुलझाडे लावून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून दैनंदिन जीवन सुकर करता येऊ शकते.परसदारात लावलेल्या एक – दोन नारळाच्या झाडांचाही वर्षाला १० – १५ हजाराचा सहज फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन प्रत्येक बांधवांने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेचा टेरेसवरील आणि बाल्कनीतील जागेचा उपयोग करत विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला फळ फुले उत्पादीत करण्याचा मार्ग अनुसरावा आणि छोट्या बचतीच्या डब्यातून प्रतिदिन थोडी थोडी रक्कम साठवत वर्षाकाठी जमणाऱ्या मोठया रकमेचा समाजाच्या चौफेर विकासासाठी उपयोग करावा या निखळ उद्देशानेच आटपाडीतून या पथदर्शक (पायलट ) प्रकल्पाची सुरुवात केली असल्याचे या मान्यवरांनी स्पष्ट केले .

परिवर्तनाच्या या मोहीमेत प्रत्येक मुस्लीम खाटीक कुटुंबांने सहभागी होत ही लोकचळवळ बनावी.प्रत्येक आठवड्यातल्या सोमवारी या सत्कार्यासाठी सर्वांनी आवर्जून वेळ काढावा असे आवाहन इंजिनियर असिफ कलाल यांनी केले.यावेळी नौमान कलाल,याह्याखान कलाल आदी उपस्थित होते.