कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.09:- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.कार्तिकी यात्रा सोहळ्याला सुरवात झाली असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. मंदिर परिसर गजबजला आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री.संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास व श्री.संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने भाविक कळस दर्शना बरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत. रात्रीची ही दृष्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत. संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे.

सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती व शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली असून याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे. यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टीकल, व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे.सुरक्षतेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत. आषाढी एकादशीप्रमाणेच महत्व असलेल्या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाची नगरी लखलखली असून विठूरायाच्या भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

यात्रेनिमित्त सेवेसाठी आलेल्या स्वयंसेवकांची अन्नछत्रा मध्ये भोजन व्यवस्था
कार्तिकी यात्रेनिमित्त श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या वारकरी भाविकांना मुबलक प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 1800 सेवेकरी काम करीत आहेत.यामध्ये मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी,रोजंदारीवरील स्वयंसेवक तसेच स्वयंसेवी संस्थांकडील स्वयंसेवकांचा समावेश आहे.
या स्वयंसेवकांना श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सेवेची जबाबदारी विभाग प्रमुख राजेश पिटले व सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी यांना देण्यात आली आहे.

त्याचबरोबर पदस्पर्श दर्शनरांगेत भाविकांना मोफत चहा व खिचडी वाटप सुरू करण्यात आले आहे. याचा शुभारंभ लेखा अधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. याकामी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येत आहे.
