दीपावली-बलप्रतिपदा/दिवाळी पाडवा २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
सावळें सुंदर रूप मनोहर
दिवाळी पाडव्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी माता हिरेजडित अलंकारांनी मढले

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.02 – दीपावली बलप्रतिपदा / दिवाळी पाडवा निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याची पगडी,कौस्तुभ मणी, नाम निळाचा, हिऱ्यांचे कंगन जोड, दंडपेठ्या जोड, मोत्याची कंठी दोन पदरी पाचूचा लोलक, मोत्याची कंटी दोन पदरी, मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मत्स्य जोड, सोन्याचे पितांबर, नवरत्नाचा हार, हिऱ्यांचे पैंजण, सोन्याचा करदोडा, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तोडेजोड इ.
श्री रुक्मिणी मातेस जडावाचे मुकुट, जडावाचे हार, नवरत्नाचा हार, जडावाचे बाजूबंद, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी हिरवी, गोट, ठुशी, मासपट्टा, शिंदे हार, सोन्या मोत्याचे ताणवड, चंद्र, सूर्य, मोत्याचा कंठा, पेठयाची बिंदी, मन्या मोत्यांच्या पाटल्या, सोन्याचे बाजूबंद, रुळ जोड , पैंजण जोड, वाळ्या जोड, मोठी नथ, सोन्याचा करंडा, छत्रछामर, तारामंडळ, चंद्रहार मोठा, सोन्याची साडी इत्यादि अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
श्री राधिका मातेस मुकुट,ठुशी नवीन, हायकोल, पुतळ्यांची माळ, जवेचीमाळ व श्री.सत्यभामा मातेस मुकुट, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
बलप्रतिपदा/दिवाळी पाडवानिमित्त श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेस अनमोल आणि खास ठेवणीतील दागिने परिधान करण्यात आले आहेत,त्यामुळे श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेचे सुवर्णरूप पाहण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली आहे तसेच दर्शन घेण्यासाठी आलेल्या भविकांमधून देवाचे सुवर्णरूप पाहून समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.