नवरात्र महोत्सव: सातवी माळ
श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०९/१०/२०२४ – घटस्थापने पासून नवरात्र महोत्सवास सुरवात होते.यानिमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस पसरती बैठक पोषाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचे मुकुट,नाम निळाचा, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगन जोड, दंडपेट्या जोड, मोत्याची कंठी दोन पदरी, नवरत्नाचा हार, हिऱ्यांचे पैंजण, तोडे जोड, पैंजणजोड, मारवाडी पेठ्याचा सोन्याचा करदोडा, मोरमंडोळी, मोत्याचा तुरा, शिरपेच, मत्स्य इत्यादी तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, नवरत्नाचा हार, खड्यांची वेणी, चिंचपेटी हिरवी, तन्मयी मोठा, मद्रासी कंठा, ठुशी, सोन्या मोत्याचे ताणवाड जोड, चंद्र, मोत्याचा कंगन मोठा, बाजीराव गरसोळी, मन्या मोत्याच्या पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र,सोन्याचे बाजूबंद जोड,पैजनजोड, कर्णफुले जोड,तारा मंडळ, पुतळ्यांची माळ, हिऱ्यांची नथ इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

राधिका मातेस नक्षी टोप,जवेच्या माळा, चिंचपेटी तांबडी, हायकोल आणि सत्यभामादेवीला नक्षी मुकुट, लक्ष्मी हार, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, जवेची माळ, जवमनी पदक इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत.

मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई- तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
