महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ,अनेक दिवसांचे मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण
आज खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही राष्ट्रीय भाषा झाली- अजय शहा पेणूरकर
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.०४/१०/२०२४ महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.अनेक दिवसांचे मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण झाले.त्यानिमित्त पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे मराठी साहित्य परिषद शाखा पंढरपूर यांच्यावतीने आनंद व्यक्त करत साखर वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यावेळी मनोगत व्यक्त करताना अजय शहा पेनूरकर म्हणाले की ,आज खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही राष्ट्रीय भाषा झाली. कारण देशातील साडेचारशे विश्वविद्यालयात मराठी भाषेचे स्वतंत्र दालनं उघडण्यात येईल. तेथे मराठी भाषा शिकवली जाईल आणि संशोधन केले जाईल . सर्व मराठी साहित्य संपूर्ण देशात उपलब्ध होईल. ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्यांचे साहित्य सर्व देशात उपलब्ध होईल.त्यामुळे मराठीचा प्रचार प्रसार तर होईलच व मराठी भाषाही वृद्धिंगत होईल.
सर्व विश्वविद्यालयात प्राध्यापक व ग्रंथपाल यांच्या मराठी भाषेसाठी नियुक्त्या होतील. त्यामुळे अनेकांना नोकर्या मिळतील.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ज्ञान प्रसाराचे काम होईल त्याचबरोबर नोकऱ्या मिळून अर्थकारणाची चक्र गतिमान होण्यासाठी मदत होईल.दरवर्षी साडेनऊशे कोटी रुपये केंद्र सरकारतर्फे संशोधन प्रचार प्रसार डिजिटलायझेशनसाठी खर्च करण्यात येणार आहेत असे सांगून मराठी भाषा संपूर्ण देशात वाढण्यास मदत होईल ही अपेक्षा व्यक्त केली.

समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असे सांगत
संत ज्ञानेश्वर माऊली,संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम यांसह महाराष्ट्रातील अनेक संतांची व समाजसुधारकांची भाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषा जाहीर केल्यामुळे मराठी भाषेला सन्मान प्राप्त झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसह असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक तसेच जनसामान्यांच्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान प्रत्येकाला सुखावणारा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रसंत चे संपादक राधेश बादले पाटील यांनी दिली.
मराठी चे जेष्ठ अभ्यासक मंदार केसकर म्हणाले की,मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे.राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आणि एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला मराठी साहित्य परिषदेचे सर्व सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.