गुणवंत विद्यार्थ्यांमुळे गावाचा नावलौकिक- दिनकर कदम
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – गावातील सामाजिक आणि भौतिक विकास ज्या पध्दतीने महत्वाचा असतो त्याच पध्दतीने गावच्या शैक्षणिक प्रगतीसही फार महत्व असते. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांमुळे गावचा नावलौकिक होत असतो असे प्रतिपादन सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील अंबीकानगर येथे जय भवानी तरूण मंडळ संचलित जगदंबा यात्रा कमेटीच्यावतीने रचना बाबासाहेब पवार हिचा एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे नंबर लागल्याबद्दल, तर प्रियंका भगवान साळूंखे यांची जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागात वरीष्ठ लिपीक तर पिंपरी चिंचवड महानगर पालिका व जिल्हा न्यायालयात लिपीक या पदावरती स्पर्धा परीक्षेतून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी कदम बोलत होते.
पुढे बोलताना दिनकर कदम यांनी गावातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात त्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी खरेदी विक्री संघाचे नारायण गायकवाड, जनसेवेचे अशोक पाटोळे ,विलास खुर्द,गणेश शिंदे,जनहीतचे औदुंबर गायकवाड, नानासाहेब व्यवहारे, किसन माने,निलेश कदम,रावसाहेब भोसले, बाबासाहेब पवार,भगवान साळुंखे , सज्जन भोसले, विकास आदमिले, जय भवानी तरूण मंडळ संचलित जगदंबा यात्रा कमेटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रचना पवार आणि प्रियंका साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून आई वडिलांचे कष्ट आणि सर्वांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आल्याचे सांगुन सर्वांचे ऋण व्यक्त केले.
याप्रसंगी नारायण गायकवाड यांनी जीवनातील शिक्षणाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक गायकवाड यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय भवानी तरूण मंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.