महाविकास आघाडी घटक पक्षांच्यावतीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंद

महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंद

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४ – बदलापूर येथील लहान मुलींवर तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचार सुरू आहेत याकडे महायुती सरकारचे लक्ष नाही. या असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार 24 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महाविकास आघाडीचे नेते नरसय्या आडम, चेतन नरोटे, अजय दासरी,यु.एन.बेरिया यांनी सोलापूर शहर पत्रकार संघात पत्रकार परिषदेत केली.

यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख दत्तात्रय वानकर, देवाभाऊ गायकवाड, रेवण पुराणिक, भीमाशंकर टेकाळे,संजय गायकवाड,विवेक कन्ना,राजेंद्र शिरकुल,सुनील सारंगी,शंकर अंजनाळकर आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.या अमानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. ज्या शाळेत हे अत्याचार झाले आहे ती शाळा सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोक यामध्ये सहभागी असल्याने पोलीस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.पीडित मुलींच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांनी त्या गरोदर मातेला अकरा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. पोलीस आणि सरकारच्या गलथान कारभाराचा व असंवेदनशीलतेचा ज्वलंत उदाहरण आहे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यातच माता-भगिनी महिला सुरक्षित नाहीत तर राज्यातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कशी असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बदलापूर येथे आंदोलन करून रेल रोको केला होता. पण सरकारकडून मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला नाईलाजाने कारवाईला सुरुवात करावी लागली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात महिला मुलींवर अत्याचार सुरू आहेत सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही.महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बदलापूरच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे.

तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनीं व व्यापारी, दुकानदारांनी या महाराष्ट्र बंद आणि सोलापूर बंद मध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार नरसय्या आडम, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top