माबि हरित चळवळी अंतर्गत क्रांती दिनी उपद्रवी परदेशी तणांना चलेजाव

क्रांती दिनी भारतातील उपद्रवी परदेशी तणांना चलेजाव…

माबि हरित चळवळी अंतर्गत अनोखा उपक्रम साजरा…

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०८/२०२४ – ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून देशभर साजरा होत असतो. या दिवशीच ब्रिटीश सरकार विरोधात चले जाव चा नारा दिला गेला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांती मुळे निर्णायक अवस्थेत आला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे.

या विशेष दिनाचे औचित्य साधून मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि); बायोस्फिअर्स; मॉडर्न कॉलेज – गणेशखिंड; न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग-पुणे; मायेसा फाऊंडेशन-पुणे; उद्यान कक्ष, पुणे महानगर पालिका,लाईफ ट्री नेचर फाऊंडेशन, इतर सेवाभावी, शैक्षणिक व संशोधन आणि शासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.०९ ऑगस्ट २०२४ (नागपंचमी) रोजी तळजाई, पाचगाव-पर्वती वनक्षेत्रात उपद्रवी परदेशी तणांबाबत योग्य ती जनजागृती व पर्यावरणीय साक्षरता यावी या हेतूने प्रतीकात्मक दृष्टीने कॉसमॉस सल्फ्यूरीयस् या मैक्सिकन उपद्रवी परदेशी तणाच्या उच्चाटन मोहीमेचे आयोजन केले होते. कॉसमॉस, धनुरा (गाजर-गवत), रानमारी, टणटणी (घाणेरी), उन्दीरमारी, सुबाभूळ (खरतर कुबाभूळ), चिमुक काटा, इ. परकीय वनस्पतींचे उच्चाटन करणे कसे गरजेचे आहे याबाबत जागर करून चले जाव चा नारा देण्यात आला.सहभागी विद्यार्थी व नागरिकांना रोपणासाठी सुवर्णपिंपळ बीज प्रसाद देण्यात आला व स्थानिक-देशी बेल वृक्षाचे रोपण देखील करण्यात आले.

सदर उपक्रमाला स्थानिक नागरिक,निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमी, हरित-कार्यकर्ते, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि न्यू इंग्लिश रमणबाग पुणे शाळेचे विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती. सदर उपक्रमाचे संयोजन डॉ.सचिन पुणेकर,प्रा. हेमंत पाठक,डॉ.प्राची क्षिरसागर,श्रीमती सायली सौदणकर,श्रीमती चैताली क्षिरसागर,संजय पारोडकर यांनी केले होते.

हिंदवी स्वराज्य स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी मुघल, आदिलशाही, कुतूबशाही, निजामशाही, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व इतर परकीय आक्रमणे परतवून लावणे हि त्या काळाची गरज होती. तसेच भारत स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटीश सरकार विरोधात भारतीयांनी याच दिवशी ब्रिटीश सरकार विरोधात चलेजाव चा मंत्र दिला.त्याचप्रमाणे आज आपल्या परिसरातील वनराई, हरित क्षेत्र उपद्रवी फिरंगी तणांमुळे झपाट्याने कमी होत आहे आणि याचा थेट परिणाम आता त्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीवर व ओघाने मानवी जीवनावर सातत्याने होत आहे.त्यातच सद्य पर्यावरणीय आणीबाणीत भारत देशावर होणाऱ्या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांच्या आक्रमणाची भर पडत आहे.त्यावर उपाय म्हणून परदेशी तणे नष्ट करायलाच हवी, त्यांचे समूळ उच्चाटन केले जावे.म्हणूनच या जैविक आक्रमणा विरोधात चले जाव या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करणे हि काळाची गरज होती.

थोडक्यात जैविक आक्रमणाबाबतचा हा जागर आहे. पर्यावरण,आर्थिक व आरोग्य विषयक उपद्रवी तणांचे (वनस्पती व प्राणी) धोके लक्षात घेवून या अभिनव, पर्यावरण संवर्धन संघटनाचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे, जनजागृतीचा भाग म्हणून माबि या हरित चळवळीचे देशभर, राज्यभर, शहरभर, गावात, प्रभागात, उपशहरात, वन्यजीव संरक्षित क्षेत्रात व इतर संबधित ठिकाणी सातत्याने आयोजन केले जावे, या उपद्रवी परदेशी घटकांबाबतीत योग्य ते शासकीय धोरण असावे, लोकसहभागातून या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांचे आपल्या राष्ट्रातून समूळ उच्चाटन व्हावे. तसेच माबिच्या माध्यमातून तण मुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत हा संदेश देखील जनमानसात रूढ करण्यात यावा या उद्देशाने जागतिक परिसंस्था पुनरुज्जीवन दशकाचे तसेच ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top