पुणे सोलापूर महामार्गावरील सावळेश्वर, शेटफळ येथील अंडर बायपासचा प्रश्न संसदेत
खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नांना गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०७/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर-पुणे महामार्गा वरील सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ आणि सावळेश्वर येथे उड्डाण पूल,अंडर बायपास करणे आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर महामार्गाची देखभाल व दुरुस्ती वेळेवर करण्यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे.

त्यास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरले आहे.या राष्ट्रीय महामार्गांमुळे अनेक गावे महामार्गाला जोडली गेली आहेत.

मात्र या महामार्गाचे काम होत असताना कित्येक गावामध्ये अंडरपास करण्यात आलेले नाहीत.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.यामध्ये प्रामुख्याने सोलापूर पुणे महामार्गावरील शेटफळ येथे अंडरपास आणि सावळेश्वर गाव येथे उड्डाणपूल अथवा अंडरपास नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या गैरसोय होत असून वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे.