पांडुरंगाच्या रथाचा मानकरी : वडार समाज पंढरपूर
यंदाच्या आषाढी यात्रेचा सोहळा आनंदात साजरा होणार आहे.
ओढू पांडुरंगा रथ ! आम्ही वडार भाग्यवंत !!
पांडुरंगाचा रथ ओढण्याचा मान वडार समाजाला
आम्ही भाग्यवंत । पांडुरंगाचे वारकरी ।। ओढू पांडुरंगाचा रथ।। आम्ही वडार मानकरी ।।
आषाढी, कार्तिकी या दोन प्रमुख यात्रा आणि या यात्रेसाठी येणारा भाविकांचा महापूर म्हणजे या पृथ्वीतळावरील एक अनुपम भक्ती सोहळा आहे.पांडुरंगाचे मुखीनाम घेत पांडुरंगाच्या वारीस निघालेला वारकरी घरातून पाऊल बाहेर पडताच मनाने पंढरीस पोहचलेला असतो.पांडुरंगाची सगुण साकार मुर्ती सदैव आपल्या हृदयात व नेत्रात साठवून ठेवलेला भक्त वारीस येेतो व तो केवळ देहरूपी वारी पोहोचविण्यासाठी.मनाने तो नित्य पंढरीत येत असतो.
आषाढी, कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या वेळी पांडुरंगाचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघतो आणि पांडुरंगाच्या प्रदक्षिणा मार्गावर भक्तांची अलोट गर्दी होते.सावळ्या पांडुरंगाची प्रतिकात्मक मुर्ती रथात ठेवली जाते.

पेशवाई काळात श्रीमंत गोविंदपंत खाजगीवाले सरकार आजच्या माहेश्वरी धर्मशाळेत वास्तव्यास होते.पूर्वीच्या काळीही पंढरपूर येथे आषाढी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी होत असे. या रथावर बसण्याचा मान पंढरपूर येथील श्री.नातू, श्री.रानडे, श्री.भाटे या खाजगीवाले यांच्या नातेवाईकांना तसेच बारा बलुतेदारांना आहे. रथ ओढण्याचा मान वडार समाजाला आहे. मूळ रथ हा लाकडी असून त्याचे वजन 2 टन एवढे आहे.
सन 1737 पासून संस्थानच्यावतीने सुमारे 287 वर्षांपूर्वी ही रथयात्रेची परंपरा सुरू करण्यात आली.अतिशय सुबक आणि आकर्षक अशा लाकडी रथात विराजमान झालेले भगवंत आपल्या क्षेत्राची नगर प्रदक्षिणा करावयास निघतात आणि त्यांचा रथ ओढण्याचा मान असतो तो पंढरीतील वडार समाजाला.
सध्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला 700 वर्षापुर्वीचे रुप देण्याचे काम सुरू आहे. त्यातही कारागीर म्हणून महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या वडार समाजाच्या लोकांनी काम केले आहे.साऱ्या विश्वाच्या अस्तित्वाचा वडार हा कष्टकरी समाज दिवसभर काबाडकष्ट करायचा आणि मुखी पांडुरंगाचे नाव घेत रात्रीचे दोन घास भोजन करायचा अशी या समाजाची परंपरा होती. पांडुरंगाचा महान रथ ओढण्याचा मान या कष्टकरी समाजाला मिळाला आहे. हे या समाजाच्या दृष्टीने परमभाग्याचे प्रतिक समजले जाते.
महाराष्ट्रामध्ये तीन पवित्र पायरीचे दगड आहेत यामध्ये पंढरपूरामध्ये दोन पायऱ्या आहेत यात 1) श्री संत चोखामेळा यांची पायरी, 2) श्री संत नामदेव महाराज यांची पायरी या दोन भक्तीच्या पायऱ्या तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेची 3) हिरोजी इंदुलकर (वडार) यांची सेवेची तिसरी पायरी स्वराज्याची राजधानी रायगड येथे आहे.
दगडाला देवपण देणारे आम्ही वडार !
करतो कष्ट अन् मुखी देतो हरीचे नाम आम्ही वडार !!
छनीने मारतो दगडाला घाव तोच भाग्यवंत आम्ही वडार !!
या उक्तीप्रमाणे आम्ही हरिचे नाम मुखामध्ये घेवून दिवसभर कष्ट करीत असतो.
काये कष्ट वाचे हरिनामा !
आम्ही भाग्यवंत आम्हा हेची काम !
आम्ही वडार भाग्यवंत !!
या अभंगाप्रमाणे कष्टाचा प्रपंच अन् सेवेचा परमार्थ करणाऱ्या वडार समाजाला मिळाला रथ ओढण्याचा मान हा आमच्या वडार समाजाचा प्रत्यक्ष परमेश्वराने केलेला सन्मान आहे असे आम्ही समजतो.
लेखक- श्री.दिपक बापू गुंजाळ पंढरपूर मो.नं.9561521997
