पेपर फुटीसारख्या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा होती पण विरोधकांना कोणत्याही गोष्टींवर राजकारण करण्याची सवय-पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली – संसदेच्या २०२४ च्या या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पेपर फुटीसारख्या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा होती पण विरोधकांना कोणत्याही गोष्टींवर राजकारण करण्याची सवय झाली आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कारवाई करण्यात येत असल्याचे ग्वाही मी भारतातील तरुणांना देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.आम्ही आणीबाणीच्या मुद्द्यावर बोलल्यावर ते म्हणतात ही जुनी गोष्ट आहे.तुमची पापे जुनी होतात का ? त्यावेळी जयप्रकाश नारायण यांची तब्येत इतकी बिघडली की ते पुन्हा उठू शकले नाहीत.काँग्रेससोबत बसलेल्या अनेक पक्षांची काही मजबुरी असेल जे पक्ष अल्पसंख्यांकांबरोबर असल्याचा दावा करतात. आणीबाणीच्या काळात तुर्कमान गेट आणि मुजफ्फरनगर येथे जे घडले त्याबद्दल बोलण्याचे धाडस ते करू शकतात का? आता हेच लोक काँग्रेसला क्लीन चिट देत आहेत. सध्याची काँग्रेस ही परजीवी आहे. देशातील जनतेने आजही त्यांना स्वीकारलेले नाही. त्यांना खोट्या गोष्टी आणि बनावट व्हिडिओद्वारे देशाची दिशाभूल करण्याची सवय लागली आहे.
सरकारी तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या आरोपाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई आमचे ध्येय आहे. हा आमच्यासाठी निवडणुकीतील मुद्दा नसून 2014 मध्ये आम्ही सरकार स्थापन केले तेव्हाच सांगितले होते की आमचे सरकार गरीब यांच्या कल्याणासाठी काम करणारे आहे.आमचे सरकार भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर हल्ला करणारे आहे .आम्ही गरीब कल्याण योजना राबवत असून काळ्या पैशाच्या विरोधात कायदा केला आहे. जेव्हा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांचा लोकशाहीवरील विश्वास वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणजे मी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसलो आहे.मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आम्ही तपास यंत्रणांना भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्यांवर कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे.एकही भ्रष्टाचारी यातून वाचणार नाही ही मोदीची गॅरंटी आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेसवाल्यांनी निर्लज्जपणे भ्रष्टाचारी बचाव आंदोलन सुरू केले असून आम्ही कारवाई का करत नाही अशी विचारणा आम्हाला ते करायचे. आता भ्रष्टाचारी तुरुंगात जात आहेत तर हे लोक तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.आप ने घोटाळा केला तर काँग्रेसवाले तक्रार करतात आणि सरकारने कारवाई केली तर मोदीला शिव्या घालतात.दिल्लीत एका मंचावर बसून भ्रष्टाचार्यांना वाचवण्यासाठी रॅली काढतात.पत्रकार परिषदेत दिलेले सर्व पुरावे हे खोटे होते का हे काँग्रेस नेतृत्वाने सांगावे. हे लोक दुटप्पी वागत आहेत .सगळीकडे ढोंगीपणा सुरू आहे.