खर्डीत नारळ विक्रीस कायमस्वरूपी बंदी
पंढरपूर /अमोल कुलकर्णी- सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी गावामध्ये नारळ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की दर गुरुवारी व अमावस्येला भाविकांची गर्दी असते तर कार्तिक वद्य त्रयोदशीला सात दिवस पुण्यतिथी सप्ताह असतो.यावेळी अनेक भाविक नारळ फोडतात.त्यामुळे होणाऱ्या कचऱ्याचा त्रास व विल्हेवाट यावरून अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.यावर उपाय म्हणून नारळ विक्री व फोडण्यावर बंदीचा निर्णय चैत्र प्रतिपदा म्हणजेच पाडव्या दिवशी घेण्यात आला.

हनुमान मंदिरामध्ये ग्रामस्थ,विश्वस्त आणि पुजारी यांच्या समवेत पाडवा वाचन होत असते.त्यावेळेस मंदिर प्रशासन, ग्राम प्रशासन यांच्यासोबत विविध विषय चर्चेला घेतले जातात. अशी परंपरा गावात गेली अनेक वर्ष सुरू आहे. यावर्षीपासून मंदिरामध्ये पावित्र्याचा विचार करून गाभारा प्रवेश मनाई, दुरून दर्शन आणि नारळ विक्री बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी सुचवला. त्यावर सर्व साधक बाधक गोष्टींचा विचार करून ग्रामपंचायत खर्डी आणि समाधी मंदिर ट्रस्ट यांचे वतीने दोन ठराव संमत करण्यात आले. यामध्ये मंदिर परिसरात नारळ विक्री व फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.नारळाचे होणारे तुकडे, त्याची कवचाले भाविकांच्या पायात घुसतात. तसेच शेष उर्वरित राहिलेला नारळाचा तुकडा हा अस्ताव्यस्त पडतो त्यातून दुर्गंधी निर्माण होते तसेच ते पायदळी तुडवले जाऊन अवमान होतो. त्या तुकड्यांसाठी विविध प्रकारचे प्राणी,पक्षी माणसांवरती धावून येतात. सर्व बाबींचा विचार करून नारळ फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

नारळ विक्रीसाठी सोलापूर कोल्हापूर महामार्गावर विक्रेत्यांची भाऊगर्दी जमल्याने अनेक वाहनांच्या अडथळ्यामुळे भाविकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.तसेच नारळ विक्रेत्यांची दंडेलशाही मुजोरी वाढल्याने भाविक त्रस्त झाले होते.वाहने पार्किंग करताना अनेक वाद विवाद होऊ लागले.या सर्व गोष्टींचा त्रास ग्राम प्रशासन व मंदिर प्रशासनाला होऊ लागल्याने नारळ व फुलहार विक्रीवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सदर बंदीचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड आकारण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी पोलीस पाटील प्रतिनिधी बालाजी रोंगे ,सरपंच भगवान सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे,बाळासो मोकाशी,हणमंत मोकाशी,बापू केसकर,हणमंत केसकर,मोहन कुलकर्णी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.