छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.24 – औरंगाबाद चे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामातंर करण्यात आलेले आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या या जिल्ह्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी शौर्याचा महामेरु असणारे योध्दे होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्या च्या वचनासाठी त्यांनी आपले बलिदान दिले. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी स्मारक ठरेल.राज्यशासनाने छत्रपती संभाजी महाराजांचे त्यांच्या नावाने असलेल्या जिल्ह्यात भव्य स्मारक उभारावे. राज्य शासनाने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे घोषित केले आहे.त्या सोबत छत्रपती संभाजीनगर मध्ये स्वराज्याच्या द्वितीय छत्रपतींचे स्मारक उभारावे अशी आपली मागणी असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले आले.या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट घेणार आहे असे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
खुलताबाद येथे पुरातत्व खात्यांच्या ताब्यात असणारी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य औरंगजेब जिंकू शकला नाही.महाराष्ट्राच्या मातीत तो गाडला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज,महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाचे द्योतक प्रतीक असणारी औरंगजेबाची कबर आहे.औरंगजेबाला या मातीत गाडले आहे त्यावरुन आता वाद नको सर्वांनी राज्यात शातंता ठेवावी असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.